पुणे | “लोकांचे लक्ष महागाई आणि बेरोजगारीवरुन हटवण्यासाठी अशी वक्तव्ये केली जात आहेत. सध्या कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांच्या अंगात काय संचारले काय माहीत. त्यांनी अशी विधाने करणे तातडीने थांबवावे”, अशा शब्दांत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी संताप व्यक्त केला.
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा करणारे विधान केले होते. त्यावर महाराष्ट्रातील अनेक नेतेमंडळींकडून अनेक वक्तव्ये केली जात आहेत. त्यात आता अजित पवार म्हणाले, ”प्रत्येक राज्याचा अस्मितेचा प्रश्न असतो. अनेक मुख्यमंत्र्यांनी राज्याला एकसंघ ठेवण्याचा काम केले. आता काहीही कारण नसताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बोलले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने आपली भूमिका मांडली पाहिजे. केंद्रानेही यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा. महाराष्ट्र अशी वक्तव्ये कदापि खपवून घेणार नाही. त्यांचे हे वक्तव्य निंदनीय असून, त्याचा निषेध करतो”.
दरम्यान, बोम्मई यांनी जत तालुक्यातील 40 गावांवर दावा करणारे विधान केले होते. त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा वादंग निर्माण झाला असताना आता त्यांनी पुन्हा एकदा नवं विधान केले आहे. त्यांनी आता सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटवर दावा केला आहे.