मुंबई | उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्ममंत्री असताना कोरोना होता, हे सर्व जगाला माहिती आहे. त्यावेळी कोणत्याही राज्याचे मुख्यमंत्री बाहेर फिरत नव्हते, पंतप्रधानही बाहेर फिरत नव्हते. चांगल्याला चांगलं म्हणावं हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधला.
राज ठाकरे यांची गोरेगाव येथील नेस्को मैदानात रविवारी जाहीरसभा झाली. या सभेत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षावर टीका केली होती. त्यावर आता खासदार सावंत यांनी निशाणा साधला. सावंत म्हणाले, कोरोना काळात अनेक सर्वेक्षणे केली जात होती. या सर्वेक्षणांमध्ये देशात उत्तम मुख्यमंत्री कोण? तर तत्कालीन मुख्यमंत्र्यांचे नाव सातत्याने समोर येत होते. त्यावेळी त्यांनी कधी कौतुक केल्याचे मला आठवत नाही. चांगल्याला चांगले म्हणावे हे बाळासाहेबांचे संस्कार आहेत.
तसेच बाकीच्या राज्यांमध्ये जेव्हा नदीत मृतहेद तरंगत होते, त्यावेळी महाराष्ट्रातील जनतेला ऑक्सिजन कसा मिळेल, यावर उद्धव ठाकरे काम करत होते. त्यावेळी केंद्र सरकारही मदत करत नव्हते, अशा अनेक समस्यांवर मात करून त्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे प्राण वाचवले, असेही अरविंद सावंत यांनी सांगितले.