मुंबई | गेल्या काही दिवसांपूर्वी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Somappa Bommai) यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 40 गावांवर दावा केला होता. यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. त्यानंतर आता ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला.
बोम्मई यांच्या विधानानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. बोम्मई यांनी जत तालुक्यातील गावांवर दावा केल्यानंतर अक्कलकोट आणि सोलापुरावरही दावा केला आहे. त्यानंतर राजकीय स्तरावरून टीका टिप्पणी केली जात आहे. विरोधकांसह सत्ताधारी शिंदे-भाजपनेही याला विरोध केला आहे.
त्यावर विनायक राऊत यांनी भाष्य केले. ते म्हणाले, अशा पद्धतीने महाराष्ट्र तोडण्याचं काम ज्या भाजपचे कर्नाटकमध्ये सरकार आहे, त्या सरकारकडून होत आहे, त्याला प्रतिबंध करणे विद्यमान महाराष्ट्र सरकारचे कर्तव्य आहे. पण दुर्दैवाने सत्तेसाठी लाचार झालेले शिंदे सरकार या भाजपच्या सरकारकडे जाणूनबुजून कानाडोळा करत आहे आणि महाराष्ट्राचे तुकडे पाडायला हे सरकार निघालेले आहे.