मुंबई | आगामी हिवाळी अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना घेरण्याची रणनीती ठरवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. एका माणसाच्या राक्षसी महत्त्वकांक्षेमुळे महाराष्ट्र मागे पडतोय. उदय सामंत यांना उद्योगमंत्री म्हणून काम करताना मी कधीच पाहिलेलं नाही. राज्य सरकारने त्यांना या संपूर्ण प्रोसेसमधून बाहेर ठेवलेलं आहे. ज्यांचा या खात्याशी संबंध नाही ते का उत्तर देत आहेत. ज्यांना मी प्रश्न विचारले, जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांना मी आव्हान दिलेलं आहे. तुम्ही मंचावर बसा मीडियासमोर आणि माझ्यासमोर डिबेट करा असं आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील इतर मुद्द्यांना डिवचत शिंदे सरकारवर टीकास्त्र सोडलं.
त्याचबरोबर महाराष्ट्राचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. महाराष्ट्र द्वेष सुरु आहे. एकीकडे या सगळ्यांना गद्दार म्हणून ओळखलं जातं आणि त्यांच्याच प्रसंगाची तुलना ही शिवाजी महाराजांसोबत केली जाते. यातून महाराष्ट्राला कमी लेखण्याचा प्रयत्न दिसत आहे. त्यांची तुलना महाराजांबरोबर करण्याचा हा प्लॅन आहे आणि त्यामधूनच अशा पद्धतीची वक्तव्य येतात असं मला असं वाटतं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं.
राज्यपालांवरून बोलताना राज्यपाल ज्या पद्धतीने बोलले त्यावरुन खोके सरकारने त्यांना परत पाठवलं पाहिजे होतं. पदमुक्त करायला हवं होतं. अजून तशी कोणतीही प्रतिक्रिया एकाही मंत्र्याकडून आलेली नाही. उलट त्यांचं वक्तव्य झाकावं म्हणून आणखी वेगवेगळी वक्तव्ये होत आहेत. कदाचित कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य हे यांना वाचवण्यासाठी असेल. दुसरी बाजू अशी असेल की, गुजरात निवडणुकीच्या तोंडावर जसे उद्योग पळवले तशी आमच्या महाराष्ट्रातून कर्नाटकला गावं पळवली. कारण आता तिथेही निवडणूक आलेली आहे. असेही ठाकरे म्हटले आहे.
दरम्यान, गोवर या आजाराच्या साथीबाबतची खरी परिस्थिती लोकांसमोर आलेली नाही. राज्यात गोवरमुळे १२ मुलांचा मृत्यू झाल्याचं माझ्या वाचनात आलं. परंतु अजूनही राज्यातील मंत्र्यांकडून ब्रीफिंग आलेलं नाही, बुलेटिन आलेलं नाही. आमचं सरकार असताना कोविडच्या काळात जसं आम्ही हाताळत होतो, दररोज बुलेटिन यायचं, मुख्यमंत्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधायचे. तसं कुठेही सत्य परिस्थिती लोकांसमोर आलेली नाही, असं आदित्य ठाकरे यांनी राज्यातील गोवर परिस्थितीवर भाष्य करून शिंदे- फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.