नाशिक | खासदार संजय राऊत हे सध्या नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन अनेक मुद्यांना स्पर्श केला. त्यामध्ये त्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. तसेच जे आमदार खासदार शिंदे गटात सामील झाले त्यांना पुन्हा निवडून दाखवा अस आव्हानही दिल आहे.
आमदार गेले म्हणून शिवसेना संपली नाही. पक्ष अजूनही जमिनीवर आहे. महाराष्ट्रात केव्हाही निवडणुका घेतल्या तरी आम्ही जिंकून येऊ. महानगरपालिका असेल किंवा अन्य निवडणुका असतील या निवडणुका भीतीपोटी टाळल्या जात आहेत. शिवसेना नवीन चिन्हावरसुद्धा विजयी होईल, शिवसेनेला कुठेही तडा गेलेला नाही, असेही राऊता म्हणाले.
खासदार गोडसे यांची राजकीय कारकीर्द संपली आहे. लोकांच्या मनात त्या ४० आमदार खासदार असलेल्या गद्दारांबद्दल चीड आहे. लोकं त्यांना खोकेवाले बोलतात. लोकं शिवसेनेच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहेत, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
यावेळी पत्रकारांनी दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्यातील मदभेदाबाबत विचारले असता, मी खासदार असलो, तरी त्यापूर्वी एक क्राईम रिपोर्टर आहे. माझा पिंड पत्रकाराचा आहे. त्यामुळे कोणाच्या डोक्यात काय सुरू आहे, ते मला चांगलं कळतं. शिंदे गटात काय सुरू आहे, हे मला माहिती आहे आणि लवकरच त्याचा स्फोट होईल , अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
दरम्यान, जे आमदार-खासदार शिवसेना सोडून गेले त्यांच्या कपाळावर ‘गद्दार’ असा शिक्का बसला आहे. ज्याप्रकारे दिवार सिनेमात अमिताभ बच्चन यांच्या हातावर ‘मेरा बाप चोर है’, असे लिहिले होते, उद्या यांच्या मुलांना आणि नातेवाईकांना लोकं गद्दारांची नातेवाईक म्हणतील, अशी खोचक टीकाही त्यांनी केली. या आमदारांच्या कपाळावर गद्दार हे शब्द कोरले गेले आहेत. त्यांच्या पिढ्यांपिढ्यांना ही गद्दारी आता शांतपणे जगू देणार नाही, असेही ते म्हणाले.