मुंबई | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे प्रकाश आंबेडकरच (Prakash Ambedkar) काय ओवेसी यांच्यासोबतही युती करू शकतात. त्यांनी आमच्या विरोधात कितीही लोकांशी युती-आघाडी केली, तरीही भाजप युतीच जिंकेल, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी लगावला.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक उलथापालथ होताना दिसत आहे. शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले आहेत. ठाकरे गटातील अनेक नेतेमंडळी शिंदे गटात सामील होत आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडी ठाकरे गटाशी युती करणार असल्याची माहिती आहे. त्यावर बावनकुळे यांनी मोठं विधान केले आहे.
बावनकुळे म्हणाले, ”आमच्या विरोधात कितीही लोकांशी युती-आघाडी केली, तरीही भाजप युतीच जिंकेल. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही 51 टक्के मतांची लढाई लढून कोणत्याही निवडणुकीस कधीही सज्ज आहोत”.