मुंबई | महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात तेढ निर्माण झाला आहे. महाराष्ट्रातील वाहनावर बेळगावात दगडफेक करण्यात आली. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी निशाणा साधला. पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तातडीची पावले उचलत मंत्र्यांची ‘वर्षा’वर बैठक बोलावली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र आणि कर्नाटकात सीमाप्रश्नावरून वादंग झाला आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये, अशा सक्त सूचना दिल्या होत्या. त्यांच्या या सूचनेनंतर महाराष्ट्रातील मंत्र्यांनीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून बेळगावात न जाण्याचा निर्णय घेतला. त्यात महाराष्ट्राच्या वाहनावर बेळगावात दगडफेक करण्यात आली. त्यानंतर शरद पवारांनी स्वत: बेळगावात जाण्याचा इशारा दिला.
महाराष्ट्रातील मंत्र्यांची तातडीची बैठक
आता महाराष्ट्र सरकारच्या सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’वर बोलवले आहे. त्यानुसार, आता मंत्री जमत आहेत. यामध्ये बेळगाव सीमा विवादावर सुरु असलेला सर्वोच्च न्यायालयातील खटला, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला इशारा, मंत्र्यांचे बेळगावमध्ये जाणे आदी गोष्टींवर चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.