नागपूर | आजपासून हिवाळी अधिवेशनास सुरुवात झाली आणि पहिल्याच दिवशी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा सभागृह उपस्थित झाला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या बैठकीबद्दल आणि कर्नाटक सरकारच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केला असता यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरोधकांवर हल्लाबोल केला.
विरोधी पक्षनेत्यांनी मांडलेला मुद्दा सभागृहाच्या आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. उपमुख्यमंत्री देखील माझ्यासोबत होते. पहिल्यांदा केंद्रीय गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप केला. मध्यस्थी केली. बैठक बोलावली. मला वाटतं गेल्या अनेक वर्षामध्ये हे पहिल्यांदा घडलं आहे त्यांनी हि बाब गांभीर्याने घेतली आहे असे मुख्यमंत्री शिंदे म्हटले. तसेच आम्ही शहा यांना सीमावादावरून निर्माण झालेले वाद, गैर प्रकार हे कायदा सुव्यवस्था आणि लोकशाहीला धरून नाहीत. अॅक्शनला रिअॅक्शन होऊ शकते, हे देखील आम्ही स्पष्टपणे मांडलं,’ अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.
त्यावर, गृहमंत्र्यांनी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना योग्य सूचना, समज दिली. अमित शहा यांनी स्वतः माध्यमांसमोर केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांच्या भूमिकेचं अभिनंदन करायला पाहिजे होतं असं म्हणत एकनाथ शिंदेंनी विरोधकांना टोला लगावला.
दरम्यान, यापूर्वी कुठले सरकार केंद्रात होते. महाराष्ट्रात होते. कर्नाटकात होते हे तुम्हाला माहिती आहे. एकीकरण समितीचं आंदोलन यापूर्वी कुठल्या सरकारमध्ये झालंय. कुठल्या सरकारने याला परवानगी दिली नाही आणि कुठल्या सरकारने दिली याची माहिती घ्या. असेदेखील शिंदे यांनी मविआवर निशाणा साधत म्हटले आहे.
तसेच यापूर्वीच्या सरकारने (महाविकास आघाडी) मुख्यमंत्री धर्मदाय निधीचे पैसे बंद केले होते. त्या ठिकाणच्या योजना बंद केल्या होत्या. आम्ही चार महिन्यात सरकार आल्यानंतर पहिलं ते सुरू केलं. आम्हाला यात राजकारण करायचं नाही. असेदेखील ते म्हटले आहे.