मुंबई | “यांना जर मस्ती आली असेल तर आपणही कोयना, वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाही”, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना धारेवर धरले.
गेल्या काही दिवसांपासून कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरून राजकारण तापत आहे. विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जात आहे. त्यानंतर आता जयंत पाटील हे बोम्मई यांच्यावर भर सभागृहात चांगलेच भडकले. ते म्हणाले, “सीमाभागातील मराठी माणसांवर पाळत ठेवली जात आहे, जाणीवपूर्वक मराठी माणसाला त्रास दिला जात आहे. याचा आपण जाब विचारला पाहिजे, कर्नाटकचे मुख्यमंत्री ज्या भाषेत बोलत आहेत त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यायला पाहिजे”.
दरम्यान, आपणही कोयना, वारणा आणि सातारा जिल्ह्यातील धरणांची उंची वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. त्याशिवाय हे वठणीवर येणार नाही, असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.