मुंबई | शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) नोटीस पाठवली आहे. त्यांना 17 जानेवारी रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात राज्यात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आले आहे. त्यानंतर ठाकरे गटातील राजापूरचे आमदार राजन साळवी आणि कुडाळ-मालवण मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक यांना यापूर्वी एसीबीने नोटीस पाठवली होती. आता नितीन देशमुख हे एसीबीची नोटीस मिळालेले ठाकरे गटाचे तिसरे आमदार आहेत.
चौकशीसाठी हजर राहणार
मी चौकशीसाठी हजर राहणार आहे. पण तक्रार देणाऱ्याचं नोटीसमध्ये नाव नाही. एखाद्या आमदाराला नोटीस पाठवायला कुणाची तक्रार आहे, त्याचा उल्लेख असायला हवा. पण नोटीसमध्ये तसा उल्लेख नाही. माझ्याकडे कोणती संपत्ती अवैध आहे, त्याचाही उल्लेख नाही, असेही ते म्हणाले.