कागल | राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुणे येथील घरांवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटेपासूनच छापेमारी सुरु केली आहे. कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच मोठ्या संख्येने कार्यकर्ते त्यांच्या घराबाहेर जमले आहेत. मोठा पोलीस बंदोबस्त देखील येथे तैनात करण्यात आला आहे.
सध्या हसन मुश्रीफ हे त्यांच्या मुंबईच्या घरी आहेत. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुश्रीफ यांच्या मुलीच्या घरीदेखील धाड टाकली आहे. ईडी आणि आयकर विभागाचे २० अधिकारी हसन मुश्रीफ यांच्या घरी आले. त्यांनी मुश्रीफ यांच्या घरातील कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. तसेच घराभोवती सुरक्षा जवानांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
आप्पासाहेब नलावडे साखर कारखान्याप्रकरणी ईडी आणि आयकर विभागाने ही धाड मारली आहे. मुश्रीफ यांच्यावर 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे.
पुण्यातील हसन मुश्रीफांचा भागीदार चंद्रकांत गायकवाड यांच्या कार्यालयात देखील ईडीची कारवाई सुरु करण्यात आली आहे. ब्रिक्स इंडीया प्रायव्हेट लिमीटेड येथे अधिकाऱ्यांकडून झडती सुरु आहे.
दरम्यान, हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांकडून कागल बंदचे आवाहन देखील करण्यात आले आहे.