मुंबई | राजधानी दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज भाजपचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे. या बैठकीला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह पंकजा मुंडे या देखील उपस्थित असणार आहेत.
मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस हे दोघे दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते अमित शहा यांची भेट घेणार असून, राज्यातील विकासकामांबाबतही यावेळी चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्नही मार्गी लागण्याची चिन्ह आहेत. काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदी मुंबईमध्ये येऊन गेले. त्यानंतर लगेचच मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीस हे दिल्लीला पोहोचले आहेत. त्यामुळे भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे.
पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीकडे लक्ष
अमित शहा यांच्यासोबत सायंकाळी चार वाजता बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे नाराज असल्याचे वृत्त दिले जात आहे. त्यानंतर आता पंकजा मुंडे देखील या बैठकीला हजर राहणार आहेत. त्यामुळे आता त्यांच्या उपस्थितीकडे विशेष लक्ष लागले आहे.