बारामती | खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील पालखी मार्ग आणि लोणंद (सातारा) या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा नीरा-बारामती हा रस्ता राष्ट्रीय रस्ते महामंडळाकडे वर्ग करून तो राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात यावा, अशी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एका पत्राद्वारे मागणी केली आहे.
माजी सनदी अधिकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संभाजीराव झेंडे यांनी सुळे यांच्या वतीने गडकरी यांना हे पत्र दिले. सध्या हा रस्ता राज्य मार्ग आहे.
राष्ट्रीय महामार्ग ९६५ संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग (नीरा जंक्शन येथे) आणि राष्ट्रीय महामार्ग ९६५ डी लोणंद सातारा रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग १६० यांना जोडणारा नीरा बारामती मार्ग (४१ कि.मी.) हा रस्ता वर्दळीचा असून तो राष्ट्रीय महामार्ग करावा, अशी स्थानिक नागरिकांचीही मागणी आहे.