शिवजयंतीनिमित्त दीपक पायगुडेंनी केली मोहिमेची घोषणा
पुणे | गडकिल्यांचे संवर्धन आणि महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाचं अवलोकन करण्यासाठी १ लाख विद्यार्थी व नागरिकांना रायगड दर्शन घडविण्याचा संकल्प ‘लोकसेवा प्रतिष्ठान’ ने केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे दैवत मात्र, त्यांचा इतिहास नवीन पिढ्यांना समजला पाहिजे. आपल्या भविष्यातील पिढ्या पराक्रमी घडवण्याची ताकद महाराजांच्या इतिहासात आहे. त्यासाठी गडकिल्ल्यांचे जतन महत्वाचे असून प्रत्यक्षात तिथं जाऊन नवीन पिढीला इतिहासाची ओळख करून देण्यासाठी ही मोहिम आखण्यात आल्याची माहिती लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक पायगुडे यांनी आज दिली.
पत्रकार भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत किल्ले रायगड दर्शन मोहिमेची घोषणा दीपक पायगुडे यांनी केली. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, उद्योजक राहुल जाधव, महादेव इंगळे, अमित गिरे, श्रीधर चव्हाण, चेतन धोत्रे, सारंग सराफ आणि गणेश पायगुङे आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या या विशेष मोहिमेबाबत महाराष्ट्रातील विद्यार्थी व नागरिकांना या दुर्गभेटीसाठी प्रेरीत करण्याचे आवाहन पायगुङे यांनी केले. विविध शाळांतील सुमारे एक लाख विद्यार्थ्यांना ना नफा ना तोटा या तत्वावर रायगड दर्शन घडवण्याचा संकल्प आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने करण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांना गडकिल्ल्यांची, इतिहासाची ओळख व्हावी व ते खरे प्रेरणास्त्रोत ठरावेत हा विचार देशभर पोहचावा म्हणून किल्ले रायगड दर्शनचा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पनेस मूर्तस्वरुप देण्यास लोकसेवा प्रतिष्ठान सज्ज असून त्यासाठी ‘गडकिल्ले सेवा संस्था, चिंचवड’ सहकार्य करणार आहे.