नव जागृती मित्र मंडळाच्या शिवजयंतीची जोरदार चर्चा
पुणे | महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीनुसार जयंती आहे. त्यानिमित्ताने महाराष्ट्रभर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येतीय. शिवजयंतीच्या निमित्ताने पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे नवजागृती मित्र मंडळाच्या वतीने ‘शिवकालीन शस्त्र गाथा’ म्हणजेच महाराजांच्या काळात वापरण्यात आलेल्या शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. या प्रदर्शनाचे उद्घाटन हिंदकेसरी विजेता पैलवान अभिजित कटके याच्या हस्ते करण्यात आले.
सोशल मिडियाद्वारे शिवकाळात वापरण्यात येणाऱ्या शस्त्रांविषयी अनेक गैरसमज पसरवण्यात येतात. मग त्यामध्ये शस्त्रांचे वजन असो, त्याचा आकार असो किंवा शस्त्रांचा वापर असो तो गैरसमज या प्रदर्शनामार्फत दूर होऊ शकतो अशी माहिती इतिहास अभ्यासक संतोष चंदने यांनी दिली.
त्याचबरोबर मराठा कालखंड म्हणजेच शिवकालीन कालखंडातील मोघल, राजस्थानी रजपूत, पंजाबी असे विविध प्रांतातील शस्त्र तसेच मराठ्यांच्या धोप तलवारी, वक्रतोफ आणि पट्टा गुर्ज असे अनेक प्रकारचे शस्त्र या प्रदर्शनामध्ये मांडण्यात आले आहेत.
शिवजयंतीच्या निमित्ताने दिवसभरात जवळपास चार ते पाच हजार शिवप्रेमी नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिली. शिवजयंती नाचून नव्हे तर वाचून साजरी करूया तसेच शिवकालीन इतिहासाविषयी नव्या पिढीला माहिती मिळावी या हेतूने नवजागृती मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल शर्मा यांनी या प्रदर्शनाचे आयोजन केले.
तसेच समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साहेबराव साठे, मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते निलेश थोपटे, पंकज अगरवाल, जगन्नाथ लोखंडे, अक्षय बारसकर व जुनेद तांबोळी आदी मान्यवरांनी या प्रदर्शनास भेट दिली. त्याचबरोबर यावेळी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते.