मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. नेतेमंडली तर खालच्या स्तरावर येऊन एकमेकांवर टीका टिपण्णी करत आहेत अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी 1977 मधील घडामोडींचा संदर्भ देताना पवारसाहेबांनी जे केलं ते मुत्सद्देगिरी आणि तेच एकनाथ शिंदे यांनी केलं तर गद्दारी? असं वक्तव्य केलं होतं. फडणवीस यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
आम्ही 1977 साली सरकार बनवलं त्यावेळी भाजप माझ्यासोबत होते. त्यावेळी फडणवीस कदाचित प्राथमिक शाळेत असतील. त्यामुळे त्यांना त्या काळातील त्यांना काही माहिती नसेल. अज्ञातापोटी ते असं स्टेटमेंट करतात, असं शरद पवार म्हणाले आहेत. बारामतीमध्ये माध्यमांशी बोलताना, शरद पवार यांनी विरोधकांच्या बैठकीसह देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. सोबतच राष्ट्रवादीमधील बदलांबाबतही भाष्य केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणतात एकनाथ शिंदेंनी केली तर बेईमानी आणि पवारसाहेबांनी केली तरी मुत्सद्देगिरी? असा सवाल विचारला असता शरद पवार म्हणाले की, “कधी केली पवारांनी? कधी केली हे त्यांनी सांगावं. त्यांना कदाचित पूर्वीचा इतिहास माहित नसेल. पण त्यांच्या माहितीसाठी सांगतो, मी जे सरकार बनवलं ते सगळ्यांना सोबत घेऊन बनवलं. त्यावेळी जनसंघाचे उत्तमराव पाटील हे उपमुख्यमंत्री होते. त्यानंतर हशू अडवाणी होते आणि काही सदस्य होते. त्यावेळी ते प्राथमिक शाळेत कदाचित असतील. यापेक्षा जास्त भाष्य करण्याची गरज नाही असं शरद पवार म्हटले आहेत.
त्याचबरोबर बिहारमधील पाटण्यात झालेल्या विरोधकांच्या बैठकीवर भाजपकडून टीकास्त्र सोडण्यात येत आहे. यावर प्रतिक्रिया देताना, अशी भाष्य करणं पोरकटपणा आहे. या संबंध बैठकीत पंतप्रधानपदावर चर्चा देखील झाली नाही. महागाई, बेरोजगारी आणि धार्मिक तेढ या मुद्द्यांवर चर्चा झाली, असं पवारांनी सांगितलं.
तसंच लोकशाहीत बैठक घ्यायला परवानगी नाही? असा सवालही पवारांनी उपस्थित केला. भाजप प्रदेशाध्यक्षांचं वक्तव्य आलं की बैठकांची गरज का होती. दुसऱ्या दिवशी त्यांचं वक्तव्य आलं की मुंबईत त्यांच्या मित्रपक्षांची बैठक ते घेणार आहेत. तुम्हाला बैठक घेता येतात पण इतरांनी बैठका घेतल्या तर तुम्हाला चिंता का वाटते. माझ्या मते मॅच्युअर पॉलिटिक्स म्हणतात त्याची कमतरता यापेक्षा जास्त काही सांगायची गरज नाही असेदेखील पवार म्हटले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीत ओबीसींना फक्त दाखवण्यापुरतं घेतलं जातं, त्यांना कोणत्या पदावर संधी दिली जात नाही, असं देवेंद फडणवीस म्हणाले होते. यावर उत्तर देताना शरद पवार म्हणाले की, पुन्हा एकदा सांगतो हे फडणवीस यांचं अज्ञान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले महाराष्ट्र अध्यक्ष होते छगन भुजबळ. ते कोण आहेत? त्यानंतर अध्यक्षपदावर पिचड होते, ते कोण आहेत? त्यानंतर सुनील तटकरे. ही सगळी यादी जर दिली अर्थात त्यांचं वाचन किती आहे याची मला माहिती नाही. पण या सगळ्या गोष्टींची नोंद न घेता वक्तव्य करतात. लोकांना माहित असतं. लोकांना हाही अनुभव आहे त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला तो वास्तवाला धरुन नाही.