पुणे | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व सदाबहार सिनिअर्स संघ बावधन यांच्या संयुक्त विद्यमाने बावधन येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्समध्ये ज्येष्ठ नागरिक सहायता मेळावा झाला. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना कायदेविषयक बाबीसंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच ‘सूर्यदत्त’च्या वतीने पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या उपाध्यक्षा व सूर्यदत्त वूमेन एम्पॉवरमेंट लीडरशिप अकॅडमीच्या अध्यक्षा सुषमा चोरडिया आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षित कुशल यांच्या हस्ते ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ने सन्मानित करण्यात आले.
यासह पिंपरी चिंचवडचे पोलीस सहआयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. काकासाहेब डोळे, सहायक पोलीस आयुक्त डॉ. विशाल हिरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना उत्कृष्ट प्रशासकीय सेवेबद्दल, सदाबहार सिनिअर्स संघाचे अध्यक्ष नीलकंठ बजाज, बावधन सिटीझन फोरमचे समन्वयक सी. एस. कृष्णन, सदाबहार सिनिअर्स संघाच्या उपाध्यक्ष वीणा मुरगुडकर, सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र खळदकर, आध्यात्मिक मार्गदर्शक आशा देशपांडे यांना ज्येष्ठ नागरिकांच्या सेवा कार्याबद्दल, तर माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील यांना उत्कृष्ट समाजसेवेबद्दल ‘सूर्यगौरव राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश खारगे, पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके यांचाही सन्मान करण्यात आला.
दरम्यान, रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त पोलीस आणि ज्येष्ठ नागरिक यांच्या सामाजिक कार्यक्रमाकरिता संस्थेच्या वतीने सभागृह उपलब्ध करून देण्यात येईल असे आश्वासन सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी दिले आहे.
तर उपस्थितांना विनयकुमार चौबे यांनी दक्षता व सतर्कता हा सरंक्षणाचा मंत्र देत केवळ ज्येष्ठ नागरिकांनी नव्हे, तर सर्वानीच कोणतेही व्यवहार काळजीपूर्वक आणि सावधगिरीने करण्याची गरज आहे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत पितालिया यांनी केले. तर निळकंठ बजाज आणि सी. एस. कृष्णन यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाबद्दल संस्थेचे आभार मानले. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.