मुंबई | रायगड येथील खालापूर नजीक असलेल्या इर्शाळवाडी भागात दरड कोसळल्यामुळे अनेक घर ढिगाऱ्याखाली गाडली गेली. रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. त्यानंतर स्थानिक प्रशासन, एनडीआरएफच्या टीमकडून शोध मोहिम हाती घेण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिनाभरापूर्वी याबाबत एक विधान केले होते. त्याचा व्हिडिओच मनसेने ट्विट केला आहे.
मनसेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. ११ जून २०२३ राज ठाकरेंनी भाषण केले होते त्यात ते म्हणाले होते की, यावर्षीच्या पावसात कदाचित कोकणात मोठ्या प्रमाणावर दरडी कोसळतील असं दिसतंय. शासन-प्रशासनाने जागृत राहावं प्रत्येकाने जागृत राहिले पाहिजे असं त्यांनी म्हटलं होते. आज तेच विधान खरे ठरले आहे. रायगड येथे इर्शाळवाडीत दरड कोसळून आतापर्यंत 10 लोकांचा मृत्यू झाला आहे. अद्यापही बरेच लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती आहे. २० जुलै २०२३ रायगडच्या इरसालवाडीवर मध्यरात्री दरड कोसळणं आणि अख्खं गाव जमीनदोस्त होणं, माणसं दगावणं हे अतिशय वेदनादायी अशी प्रतिक्रिया मनसेने दिली आहे.
इर्शाळवाडीत काय घडलं?
रायगडच्या चौक-मानवली ग्रामपंचायतीच्या हद्दीतील इर्शाळवाडी या आदिवासी बांधवांच्या वस्तीवर दरड कोसळली. गेल्या तीन-चार दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळं ही दुर्घटना घडली. दुर्घटनास्थळ दुर्गम असल्याने त्या ठिकाणी मदत आणि बचाव कार्यासाठी आवश्यक असणारी जेसीबी सारख्या मशनरी घटनास्थळी पोहोचविण्यासाठी अडथळे येत आहेत.
इर्शाळवाडीमध्ये एकूण ४८ कुटुंब आहेत, तेथील लोकसंख्या २२८ असली तरी अनेक लोक नोकरीच्या आणि रोजगाराच्या निमित्ताने बाहेर गावी असतात त्यामुळे दुर्घटनेच्या वेळी नक्की किती लोक गावात होते हे समजू शकत नाही. इर्शाळवाडी हे ठिकाण भारतीय भूवैज्ञानिक सर्व्हेक्षण (जीएसआय) विभागाच्या अहवालानुसार संभाव्य दरडप्रवण ठिकाणाच्या यादीत नव्हते अशी माहिती शासनाकडून देण्यात आली आहे.