नाशिक । लोकसभा निवडणूक अगदी दोन – अडीच महिन्यांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागलेत.आघाड्या युत्या होताना दिसतायत.जागा वाटप सुरु आहे.त्याचवेळी इच्छुकांची मांदियाळी देखील मोठ्या संख्येनं पाहायला मिळत आहे… या इच्छुकांमध्ये साधू, महंत देखील पुढे सरसावले आहेत.आध्यात्मिक काम करताना साधु महंतांना नागरिकांचे प्रतिनिधी बनण्याची इच्छा झालेली दिसत आहे. यानिमित्तानं कोण कोण साधु महंत लोकसभा लढवायला इच्छुक आहेत आणि त्याअनुषंगानं कोणती चर्चा सध्या सुरु आहे.पाहुयात…
देशात सध्या भाजपची लाट असल्याचं दिसत असल्याने साधुसंतांची पहिली पसंती थेट भाजपलाच दिसत आहे.भाजपकडून तिकीट न मिळाल्यास त्यांच्याकडून इतर पर्याय देखील शोधले जात आहेत. आतापर्यंत तरी भाजपनेच साधू महंतांना राजकारणात संधी दिली आहे. त्यातील काही प्रयोग यशस्वी देखील झाले आहेत. उत्तरप्रदेशचे योगी आदित्यनाथ असतील.राजस्थानचे महंत बालकनाथ असतील आणि सोलापुराचे जयसिद्धेश्वर स्वामी यांना भाजपने संधी दिल्याचं आपण पाहिलंय.त्यामुळं नाशिकमध्ये भाजपकडून असा काही प्रयोग होणार का हे येणाऱ्या काही दिवसांतच स्पष्ट होईल.नाशिक लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक शिवसेनेचा मतदार संघ असून हेमंत गोडसे सलग दोन टर्म नाशिकमधून खासदार म्हणून निवडून येत आहेत. हेमंत गोडसे हे सध्या एकनाथ शिंदेंसोबत आहेत. त्यामुळं भाजप आणि शिंदे गट यांच्यात काय निर्णय होतो यावर इथला उमेदवार अवलंबून असला तरी साधू महंतांनी शड्डू ठोकल्यास नाशिक लोकसभा निवडणुकीची रंगत वाढणार एवढं मात्र निश्चित आहे.