आगामी लोकसभा निवडणुका भाजपच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या आहेत. या पार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपची यंत्रणा ग्राउंड लेव्हलवर कामाला लागली आहे. त्यातच आता ग्रामीण भागासाठी ‘गाव चलो’ अभियान, तर शहरी भागासाठी वॉर्डस्तरावरील अभियान भाजपकडून राबवले जात आहे. भाजप कार्यकर्ते गाव खेड्यापाड्यातील घर न घर पिंजून काढण्यासाठी सक्रिय झाले आहेत. दिवस आणि रात्र या अभियानाची अंमलबजावणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे देखील ‘गाव चलो’ अभियानांतर्गत बीडच्या ग्रामीण भागात दौरा करत आहेत. ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. याच निमित्ताने बीडच्या पौंडूळ गावात मुक्कामासाठी गेल्या असता गावकऱ्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं.
यावेळी पंकजा मुंडे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना मोठं वक्तव्य केलं. तुमच्याशिवाय मला कोणी नाही. मला तुम्ही वाघीण म्हणालात, मी वाघिणी सारखीच जगेन. राजकारणात माझ्यासोबत दगाफटका झाला, माझा वनवास झाला. तुमचं प्रेम पाहण्यासाठीच हे सर्व झालं आहे. मला आज इथं कुंकू लावलं मला कडक लक्ष्मीचे रूप दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला गावात जायला सांगितलं. मोदी यांना त्यांच्या जीवनात संघर्ष करावा लागला. त्यांना चहा विकावा लागला. शाळेत त्यांना फी भरायला पैसे नव्हते, शाळेत जाताना त्यांना अनंत अडचणी आल्या असं देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.मी 2009 मध्ये राजकारणात आले आणि संघर्षाला सुरुवात झाली.आपल्यासाठी 2014 ची निवडणूक दुर्दैवाने चांगली ठरली नाही. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर केवळ काही दिवसात ते आपल्यातून गेले. मी 2009 मध्ये राजकारणात आले आणि संघर्षाला सुरुवात झाली. मुंडे साहेब निवडून आल्यानंतर मला रजा द्या असे म्हणाले. बाबा यमराजा पुढे अपयशी ठरले. मुंडे साहेबांनी जातीपातीचं राजकारण करायचं नाही असं सांगितलं. आपली जात केवळ वंचित आहे. त्यांच्यासाठी काम करायचं आहे असं आवाहन देखील पंकजा मुंडे यांनी ग्रामस्थांना केलं.
माझ्यावर केलेलं तुम्ही प्रेम आणि मोदी यांनी सांगितलेलं काम याची मला आज जोड मिळाली. आता कामं सुरू झाली असतील. मात्र अनेक विकासकामं माझ्या काळात मंजूर झाले आहेत. रामापेक्षा रावणाने राज्य जास्त केले. ज्याने आदर्श घालून दिला त्याच रामाचे नाव आपण घेतो. रामाला वनवास भोगावा लागला. मी आज माहेरसिन म्हणून इथ मुक्कामी आले आहे. ताईचं काय? म्हणून मला सर्व लोक विचारतात. मुंडे साहेब गेल्यानंतर मला लोक ताईसाहेब म्हणतात. माझ्यात लोक मुंडे साहेबांना बघतात म्हणून राज्यभर मला ताईसाहेब म्हणतात”, असं हि पंकजा मुंडे म्हणाल्या.पंकजा मुंडे यांची अनेक महिन्यांपासून पक्षामध्ये घुसमट सुरु असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळं त्यांच्या मनातील खदखद वारंवार समोर येत आहे.