महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. सोबतच अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्तवाचा देखील राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाणांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्याची प्रत आता प्रसार माध्यमांच्या हाती आलीये. या पत्रात अशोक चव्हाण यांनी आपण काँग्रेसमधील प्राथमिक सदस्यत्तव पदाचा राजीनामा देत असल्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. यातील विशेष बाब म्हणजे पत्रात अशोक चव्हाणांनी माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख देखील केला आहे. यावरून आता अशोक चव्हाणांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं आता अशोक चव्हाण कोणती राजकीय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.
अशोक चव्हाण यांनी सोमवारी सकाळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट घेतली आणि यावेळी त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. सोबतच आता 14 फेब्रुवारी रोजी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. अशोच चव्हाण यांच्यासोबत काही आमदार देखील जाण्याची शक्यता आहे. आज केवळ अशोक चव्हाण यांनीच राजीनामा दिला आहे, अशी माहिती विधीमंडळ सूत्रांनी दिली असून सकाळी 11 वाजून 24 मिनिटांनी आपला आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तो अध्यक्षांनी स्वीकारला असल्याचीही माहिती समोर आलीये. मात्र, अशोक चव्हाणांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर आता काँग्रेसमधील आणखी कोणते आमदार आणि नेते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार का असा प्रश्न देखील उपस्थित होऊ लागलाय.