भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री महायुतीचाच असेल. भाजपचं संख्याबळ जास्त असलं तरी संख्याबळाच्या आधारावर मुख्यमंत्री ठरणार नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. एका कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलं. राज्याचा पुढचा मुख्यमंत्री हा महायुतीचाच असेल असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. संख्याबळ वगैरे असं आम्ही काही ठरवलेलं नाही. भाजपचे संख्याबळ तर सर्वात अधिकच असणार, याबद्दल कुणालाच शंका नाही. मात्र केवळ संख्याबळाच्या आधारावर राज्याचा मुख्यमंत्री ठरणार नाही. आम्ही तीन पक्ष एकत्र आहोत. याबद्दल वरिष्ठ नेते हे तिन्ही पक्षांना विचारात घेऊन निर्णय घेतील असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असा सूर भाजपच्या कार्यकर्त्यांचा असल्याचं पाहायला मिळतं तर दुसरीकडे एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री पद भूषणवतील असा सूर शिंदे समर्थकांचा पाहायला मिळतो. तर अजित पवार गटातील नेते आणि सर्व कार्यकर्त्यांना ठाम विश्वास आहे की महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री हे अजित दादाच असतील. असं असताना राज्याचे पुढचे मुख्यमंत्री नेमके कोण होतील ? असं देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं असता देवेंद्र फडणवीस यांनी असं उत्तर दिलं आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत. अवघ्या काही महिन्यांवर आलेल्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कसून तयारीला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीसोबतच राज्यात विधानसभा निवडणूक देखील होऊ शकते. त्यासंदर्भात मतदारांचा कल जाणून घेण्यासाठी भाजपतर्फे एक सर्व्हेही करण्यात येत आहे. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं हे वक्तव्य महत्वपूर्ण ठरत आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि मनसेनेबद्दलही महत्वाचं वक्तव्य केलं. मनसे महायुतीत कुणासोबत असेल येणारा काळच सांगू शकेल. राज ठाकरे हे कधी चांगल्या सूचना करतात तर कधी टीका करतात. मनसेसोबत काम करू की नाही हे लवकरच कळेल, असंही फडणवीस म्हणाले.