कोल्हापूर | शिवसेनेच्या महाअधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट आमच्यावर ५० खोके घेतल्याचा आरोप करतो परंतू उद्धव ठाकरेंनी आमच्याकडे शिवसेना आल्यावर पन्नास कोटी रुपये मागितले होते असा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
५० कोटींच्या मागणीच्या पत्रावर शिंदे यांनी खुलासा करत आम्हाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह जेव्हा मिळाले तेव्हा शिवसेनेच्या खात्यातून ५० कोटी रुपये मिळायला हवेत असे पत्र ठाकरेंनी पाठवले होते. यांना बाळासाहेबांचा विचार नको, पैसे हवे होते. मी त्यांना ५० कोटी रुपये देऊन टाकले. हे पैसे मागताना तुम्हाला जनाची नाही तर मनाची लाज पाहिजे होती असं म्हटलं आहे.
मी उद्धव ठाकरेंवर आलेली संकटे झेलली आहेत. माझ्याकडे खूप गोष्टी आहेत, ज्या वेळेला बोलायची वेळ येईल त्यावेळी मी बोलेन असा इशारा शिंदे यांनी दिला आहे. तसेच आमच्यावर फक्त आरोपच करण्यात येत आहेत. आरोप करण्याचा अधिकार तुम्हाला आहे. आम्हाला तुमची संपत्ती नकोय, बाळासाहेब हीच आमची संपत्ती आहे, असे शिंदे म्हणाले.
बाळासाहेब असताना मातोश्री पवित्र मंदिर होते ती आता उदास झाली आहे. जिथे वाघाची डरकाळी येत होते तेथे आता रडण्याचा आवाज येतोय अशी बोचरी टीका शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. शिवसेना मोठी होण्यासाठी लोकांनी रक्ताचे पाणी केलं आहे. तुम्ही भर व्यासपीठावरून मनोहर जोशींना उतरवण्याचं काम केलं आहे. असला कोणता पक्ष प्रमुख असतो जो नेत्यांचा पानउतारा करतो असा सवाल शिंदेंनी बोलताना केला. कदमांचा मनोहर पंत करायचा होता. नारायण राणे, राज ठाकरे यांनी असे काय मागितलं की त्यांचा तुम्हाला त्रास झाला असा सवालही शिंदे यांनी उपस्थित केला आहे.