औरंगाबाद | मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून संघटनांमध्ये वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहेत. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंचे आम्हाला नेतृत्व नको. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीचा सन्मान करतो मात्र छत्रपती संभाजीराजे यांचे आम्हाला नेतृत्व मान्य नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाने ठणकावून सांगितले आहे.
राज्य सरकारने बोलावलेल्या बैठकीत छत्रपती संभाजी राजेंनी समनव्यकांना बोलू न दिल्याने औरंगाबादेतील मराठा क्रांती मोर्चाच्या समनवयकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे संभाजीराजेंनी आता आमचे नेतृत्व करू नये, अशी भूमिकाच मांडली आहे.
‘नेतृत्व करत असताना सर्व समावेशक आणि व्यापक असले पाहिजे. कोपर्डी प्रकरणापासून अन्यायाला वाचा फुटली. त्यानंतर आम्ही सर्व एकत्र आलो, जे पहिल्यापासून सर्वजण एकत्र होते. कालच्या बैठकीला त्यापैकी एकही माणूस नव्हता. नेमकी नेतृत्व करण्याची जबाबदारी कुणी दिली? कुणी सांगितलं हे आमचं नेतृत्व आहे? आमचे कुणीही नेतृत्व नाही, हे आम्हाला मान्य नाही.आमचं नेतृत्व फक्त छत्रपती शिवराय हेच आमचं नेतृत्व आहे’ असं मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांचं म्हणणं आहे.
तुम्ही तुमच्या बैठका रात्रीच्या अंधारामध्ये घेतात, काय चाललंय काय नेमकं? सर्व व्यापक बैठक का होत नाही, लोकांना बोलावून बैठक घेतात आणि व्यापाक बैठकीचे स्वरूप देतात. मोजकेच लोक गोळा करता. मराठा क्रांती मोर्चाचे नेतृत्व कुणीही नाहीये. औरंगाबादमधून मोर्चाला सुरुवात झाली आम्ही त्या मोर्चाचे शिलेदार आहोत. जोपर्यंत आमच्यासोबत चर्चा होत नसेल तर तुम्हाला पळताभुई थोडी होईल. अशी अवस्था केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही समन्वयकांनी दिला.