पुणे | येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाच्या हालचालींना वेग आला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विविध दौरे, सभा आणि कार्यकत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत तर दुसरीकडे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये धडक मोर्चा काढण्यात आला आहे.
हा मोर्चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी काढण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे पुणे शहरात संघटना बांधणी करत आहेत. आता मनसे युवकांना लक्ष करुन त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुंना अमित ठाकरे यांच्या शिष्टमंडळाखाली निवेदन देण्यात आले आहे. त्यावेळी शर्मिला ठाकरे, बाळा नांदगावकर आदी उपस्थित होते.
विद्यापीठात नवीन वसतीगृह बांधण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, विद्यापीठाने शैक्षणिक संकुलात रोजगार मेळावे घ्यावेत, विद्यापीठात विद्यार्थ्यांना योग्य आहार मिळावा अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रत्येक विद्यापीठाच्या अधिसभेची निवडणूक मनविसे लढवणार असून, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास सर्वाधिक प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यापीठाने मागण्यांची योग्यप्रकारे पुर्तता केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी दिला आहे.