मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत २ मार्च रोजी बारामतीत नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विविध विकासकामांची उद्घाटन देखील होणार आहेत. या कार्यक्रमाच्या पत्रिकेत राज्यसभेचे खासदार असलेल्या शरद पवार यांचं नाव वगळण्यात आलं. पत्रिकेवर खासदार सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे, वंदना चव्हाण आणि खासदार श्रीरंग बारणे यांची नावं आहेत… मात्र शरद पवार यांचं नाव नाही.. त्यांना याचं आमंत्रण देखील देण्यात आलेलं नाही. यावर आता शरद पवार यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्या घरी म्हणजेच गोविंदबागेत जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. शरद पवार यांच्या या बाउन्सरची राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
बारामतीत होणाऱ्या कार्यक्रमाला शरद पवार यांना बोलवण्यात न आल्याबद्दल खासदार सुप्रिया सुळे यांनी आश्र्चर्य व्यक्त केलंय. २०१५ च्या जीआरनुसार अशा कार्यक्रमांना स्थानिक लोकसभा आणि राज्यसभा खासदारांचे नाव घालावे लागते. शरद पवार राज्यसभेचे खासदार आहेत. कार्यक्रमपत्रिकेत वंदना चव्हाण यांचं नाव आहे पण पवारांचं नाही. हे का झालं याचं उत्तर माझ्याकडेही नाही. यांचं उत्तर प्रोटोकॉल विभागाला विचारावे लागतील असंही सुळे म्हणाल्या.
बारामतीत होणाऱ्या या कार्यक्रमाची गेल्या काही दिवसांपासून चर्चा आहे. विेशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी शरद पवारांनी वेळ राखून ठेवला असल्याचं बोललं गेलं.. पण सरकारकडून त्यांना आमंत्रण दिलं नाही. आणि यावरूनच शरद पवारांनी गुगली टाकत बारामतीला येणाऱ्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना घरी जेवणाचं आमंत्रण दिलं आहे. शरद पवारांनी फोनवरुन आमंत्रण दिल्याचीही माहिती पुढे आली आहे…मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर शरद पवार यांनी टाकलेल्या या बाउन्सरवर आता ते काय उत्तर देतात याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.