नवी दिल्ली | आज देशामध्ये येणाऱ्या लोकसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यानुसार, देशभरात १९ एप्रिल २०२४ ते १ जून २०२४ या कालावधीत सात टप्प्यांमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, तर ४ जून २०२४ देशात मतमोजणी प्रक्रिया पार पडेल त्याच दिवशी निवडणुकांचे निकाल हाती येतील. त्यामुळे आपलं नाव मतदार यादीत आहे की नाही हे आधी तपासून घेणे गरजेचे आहे.
मागच्या वेळी मतदार यादीत जरी तुमचं नाव असलं तरी पुन्हा ते आहे का हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मतदार यादी दरवेळी अपडेट होत असतात, त्यामुळे त्यात बदलही होण्याची शक्यता असते. काही वेळा मतदार यादीतील तुमचं नाव चुकू शकतं किंवा तुमच्या पत्त्यात काही बदल झालेला असू शकतो. काही वेळा चुकीने तुमचं नाव वगळलं जाऊ शकतं, त्यामुळे या सर्वाची खबरदारी म्हणून तुम्ही मतदार यादीत तुमचं नाव चेक केलं पाहिजे, मतदार यादीतील तुमच्या तपशीलात काही दुरुस्ती असल्यास तुम्ही त्या निवडणुकाच्या 10 दिवस आधीपर्यंत बदलून घेऊ शकता.
मतदार यादीत तुमचं नाव कसं शोधाल?
1. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने मतदार यादीत तुमचं नाव शोधू शकता. त्यासाठी सर्वप्रथम https://voters.eci.gov.in/ या लिंकवर क्लिक करा
2. वेबसाईटच्या मुखपृष्ठावरील ‘Search in Electoral Roll’ टॅबवर क्लिक करा.
3. आता वेबसाईटच्या वरच्या बाजूला तुम्हाला 3 पर्याय दिसतील. ‘Search by Details’, ‘Search by EPIC’, ‘Search by Mobile’ या पैकी एका पर्यायावर क्लिक करा.
4. आवश्यक माहिती (Basic Information) आणि कॅप्चा कोड सबमिट करा, यानंतर ‘Search’ वर क्लिक करा.
5. यानंतर मतदार यादीतील तुमचं नाव, EPIC Number आणि सर्व माहिती दिसेल.
6. समजा जर सर्च केल्यानंतरही तुम्हाला तुमचं नाव दिसत नसेल तर तुम्ही भरलेले तपशील एकदा तपासून पाहावे किंवा तीनपैकी इतर दोन पर्यायाचा वापर करावा. तरीही नाव न दिसल्यास राज्य निवडणूक कार्यालयाशी संपर्क साधा.