लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मात्र, अजूनही महाराष्ट्रात महाविकास आघाडी असो की महायुती जागावाटपाचा पेच सुटल्याचं चित्र नाहीये. भाजपने वीस जागांवर उमेदवारांची यादी जाहीर केली असली तरी उर्वरित मतदारसंघांमध्ये अजूनही भाजप-अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना यांच्यामधला जागा वाटपाचा सस्पेन्स कायम आहे.दुसरीकडे, महाविकास आघाडीचं हि जागा वाटपाचं गणित सुटलंय असं दिसत नाहीये. पण इतर मतदारसंघांबाबत चर्चा सुरू असली तरी एका मतदारसंघातल्या उमेदवारीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं एकमत झालं आहे.तो मतदारसंघ म्हणजे कोल्हापूर. कोल्हापूरमधून श्रीमंत शाहू छत्रपती निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झालं आहे.त्यामुळे शाहू महाराजांविरोधात भाजप समरजित घाटगेंना उमेदवारी देणार की धनंजय महाडिकांना मैदानात उतरवणार? युतीमध्ये शिवसेनेकडे असलेल्या या मतदारसंघावर एकनाथ शिंदे दावा सांगणार का? शाहू छत्रपतींच्या उमेदवारीने इथं काय परिणाम होऊ शकतो? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेऊयात…
कोल्हापूरची जागा ही शिवसेना लढवत आली आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना या जागेवर दावा सांगू शकते. पण भाजपने आधीच स्पष्ट केल्यानुसार ज्याच्यात कार्यक्षमता त्यालाच उमेदवारी दिली जाणार हे स्पष्ट केलेलं आहे.. त्यानुसार संजय मंडलिकांबद्दल फारसे पॉझिटिव्ह रिपोर्ट नसल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे उमेदवार बदलला जाऊ शकतो… अशावेळी भाजप इथून समरजित घाटगे यांना उमेदवारी देईल अशी चर्चा आहे. राजर्षी शाहू महाराजांचे जनक घराणे विरुद्ध त्यांचे दत्तक घराणे असं चित्र या निमित्ताने उभं राहू शकतं..दुसरा पर्याय धनंजय महाडिक यांचाही आहे. लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी जी क्षमता लागते, ती महाडिकांकडे आहे. त्यामुळे शाहू महाराजांविरोधात लढत उभी राहू शकेल असा उमेदवार देण्याचा प्रयत्न महायुतीकडून केला जाईल हे निश्चित आहे.