सांगली | राज्यात सांगलीची जागा नुकतीच चर्चेत आली आहे. इथे महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांमध्ये थेट लढत होईल अशी शक्यता वाटत असताना आता तिहेरी लढत पाहायला मिळणार हे निश्चित झाले आहे. महायुतीतून भाजपचे विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली. महाविकास आघाडीत ठाकरेंच्या शिवसेनेतून चंद्रहार पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे तर अपक्ष उमेदवार म्हणून कॉंग्रेसमध्ये बंडखोरी केलेले विशाल पाटील उभा राहिले आहेत. शिवाय ही बंडखोरी कॉंग्रेसचीच आहे असही त्यांनी म्हटलं आहे आता यावर कॉंग्रेस काय भूमिका घेणार? याविषयीची अधिक माहिती मिळवण्याकरता सदर व्हिडीओ पाहा.
महाविकास आघाडीत धक्कातंत्र वापरत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सांगली लोकसभा मतदार संघ आपल्या पदरात पाडून घेतला आहे. खरं तर खेचून आणला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. इथून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे लोकसभा लढवण्याचे स्वप्न साकार झाले आहे. खरंतरं या जागेसाठी कॉंग्रेस आग्रही होती. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडून राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी उमेदवारीची मागणीही केली होती मात्र, महाविकास आघाडीच्या जागा वाटपात सांगलीची जागा ठाकरेंच्या शिवसेनेला गेली. विशाल पाटील गेली दोन वर्षे लोकसभेसाठी प्रयत्नशील होते. काँग्रेसचे नेते माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली लोकसभेसाठी जोमाने तयारी करत असताना अचानकपणे ठाकरेंच्या शिवसेनेतून नुकताच पक्षप्रवेश केलेल्या पैलवान पाटील यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे अर्थातच कॉंग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला.
त्यांनतर या जागा वाटपाचा फेरविचार होऊन सांगलीत पुन्हा काँग्रेसला संधी मिळेल या आशेवर विशाल पाटील होते मात्र, शिवसेनेने फेरविचार टाळून त्यांनी आपलीच उमेदवारी कायम ठेवली. त्यांनतर महाविकास आघाडीतील काँग्रेस नेत्यांचा दबाव झुगारत विशाल पाटील यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर विशाल पाटील यांनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी काँग्रेसने अखेरच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. त्यांच्या उमेदवारीचा काँग्रेस श्रेष्ठीकडे आग्रह धरणारे माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनीही पुढील राजकीय भवितव्य लक्षात घेउन उमेदवारी मागे घेण्यासाठी केलेलं आवाहन डावलून त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला शिवाय विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी मागे घेऊन मविआचे पैलवान पाटील यांना पाठिंबा द्यावा यासाठी राजकीय दबाव टाकण्याचे प्रयत्नही झाले मात्र, कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर पाटील यांनी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली. त्यांनी उमेदवारी दाखल करत असताना मागणी केलेली तीनही चिन्हे वगळून लिफाफा हे चिन्ह त्यांना निवडणूक निर्णय अधिकार्यांनी दिलं आहे.
आता महाविकास आघाडीकडून पैलवान पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली असली तरी त्यांच्या प्रचाराला अजूनही गती मिळाली नाही. त्यांना आघाडीतला घटक पक्ष असलेला कॉंग्रेस या पक्षातून पाठींबा मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता परंतु नुकताच सांगलीत कॉंग्रेसचा मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार प्रयत्न करावेत असे आवाहन कॉंग्रेसकडून करण्यात आले आहे. आता कॉंग्रेससमोर एकीकडे विशाल पाटील यांची बंडखोरी आहे तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीचा धर्मपालनाचा तिढा आहे. विशाल पाटील म्हणतायत की, हे काँग्रेसचंच बंड आहे. तर ठाकरेंची शिवसेना विशाल पाटलांवर कारवाई व्हावी यासाठी अडून बसलीय. त्यामुळे या स्थितीत काँग्रेस काय निर्णय घेणार हेही तितकच महत्वाच आहे. कॉंग्रेससाठी हा निर्णय कठीण आहे. या कार्यकर्ता मेळाव्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भाजपला पराभूत करणे आवश्यक असल्याचे सांगितले. पाटील यांच्याबाबतचा अहवाल दिल्लीला पाठविला जाईल आणि त्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल असंही पटोले यांनी सांगितले. आमदार विश्वजित कदम यांनी काँग्रेस एकसंध करत विशाल पाटील यांचे नेतृत्व केले होते. त्यांच्यासाठी ते मुंबई, दिल्लीला गेले मात्र, त्यांना उमेदवारी मिळवण्यात अपयश आले. आता विशाल पाटील यांच्या बंडात त्यांना मध्ये सोडून जाणे विश्वजित कदम यांना कठीण आहे. त्याचवेळी पक्षाचं धोरण देखील तेवढच महत्त्वाचं आहे. या कोंडीतून ते कसा मार्ग काढतात? पैलवान चंद्रहार पाटलांना या निवडणुकीसाठी कॉंग्रेसचा किती आणि कसा पाठींबा मिळणार हेही पाहावं लागेल.