लाखोंचे मोर्चे , उपोषण आणि ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी गेल्या काही वर्षांमध्ये मराठा आरक्षण प्रश्न धगधगत असताना तो पुन्हा एकदा पेटला.विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात त्याचा अधिक परिणाम दिसून आला.आणि आता तो लोकसभा निवडणुकीत मतदानातून ही दिसून येणार का हेच आपण या व्हिडिओतून पाहुयात…
लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वी राज्यात एकाच मुद्द्याने राजकारण तापलेलं होतं आणि तो मुद्दा म्हणजे मराठा आरक्षणाचा..जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या अगदी छोट्याशा गावामध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छेडलेलं आंदोलन बघता बघता राज्यव्यापी झालं आणि ते या आंदोलनाचा मुख्य चेहरा झाले. मराठा समाजाचा मोठा पाठिंबा त्यांना मिळाला…महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये १० टक्के आरक्षण देणारं विधेयक पारित केल्यानंतर हा मुद्दा शमविण्यात थोडं फार यश महायुती सरकारला आलं. मात्र, मराठा समाजाला आपल्या मागण्या पूर्णपणे मान्य झाल्या असल्याचं वाटत नाही. त्यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा आजही ज्वलंत असून.तो या निवडणुकीतही निर्णायक ठरणार आहे.विशेषतः मराठवाड्यातील ३ आणि विदर्भातील ५ मतदारसंघांत मराठा आरक्षणाचा मुद्दा कळीचा ठरू शकतो.
सध्याच्या निवडणुकीमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा कोणताही उमेदवार घेत नाहीय तसेच मराठा आरक्षण प्रकरण हे उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ठ आहे. यावर सुनावणी सुरू आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या सुरुवातीच्या कालखंडात वेगळ्या होत्या..ते टिकू शकत नाही म्हटल्यावर ओबीसीमध्ये आपला समाज गेला तर आरक्षण मिळू शकेल असं लोकांना वाटू लागलं.मात्र यामुळे ओबीसी समाजातील लोकांना आपल्यावर अन्याय होईल असं वाटत आहे. मात्र सध्या लोकसभा निवडणुकीत ज्यांनी समाजावर अन्याय केला त्यांना पाडायचं असेल तर पाडा अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलीय..आणि त्यामुळे या मतदारसंघांतील मराठा समाजाचं मतदान हे निर्णायक आणि परिणामकारक ही ठरू शकते.