कोल्हापूर | महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना महाराष्ट्राचं लक्ष कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात लागले आहे. या मतदार संघातून कितीही उमेदवार रिंगणात असले तरी शिवसेनेचे विद्यमान खासदार संजय मंडलिक व काँग्रेसचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्यातच ही दुहेरी लढत होत आहे. कोल्हापूरच्या सामाजिक जीवनात छत्रपती घराण्याबद्दल आस्था आहे. त्यामुळेच महायुतीने मान गादीला,मत मोदींना अशा प्रचारावर भर दिला आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने मान गादीला आणि मतही गादीलाच अशी मोहीम सुरू केली आहे. विजयासाठी दोन्ही नेते झटत असले तरी विधानसभेला तुमचं बघू, आता लोकसभेला काय करायचं ते आमचं आम्ही ठरवू अशी बंडखोर भूमिका घेऊन नेत्यांच्या हातातून सुटलेल्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवरच या मतदारसंघाचा गुलाल ठरणार आहे. या नेत्यांच्या प्रचारातील मुद्दे, या मतदार संघावर कुणाची किती ताकद आहे? या निवडणुकीतील कळीचे मुद्दे नेमके काय आहेत याविषयी जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ पाहा…
कोल्हापूर लोकसभा मतदार संघात खऱ्या अर्थाने नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश आबिटकर यांच्यावर मंडलिक यांच्या विजयाची जबाबदारी आहे शिवाय मंडलिक यांच्या निकालावर मुश्रीफ यांचं विधानसभेचं राजकारणही अवलंबून आहे. या नेत्यांनी अंतर्विरोध बाजूला ठेवून मंडलिक यांच्या विजयासाठी आता कंबर कसली आहे. महाविकास आघाडीमध्ये आमदार सतेज पाटील, आमदार पी. एन. पाटील सडोलीकर, जिल्हाध्यक्ष उद्योगपती व्ही. बी. पाटील यांच्यासह उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली आहे. कोल्हापूरच्या जनतेला पक्षबदल करणं कधीच आवडलं नाही. गेल्यावेळची निवडणूक त्याभोवतीच फिरली. यंदाही तो मुद्दा केंद्रस्थानी असल्याचं पाहायला मिळत आहे. खासदार मंडलिक यांनी निवडून आल्यावर आपल्या मतदारसंघाकडे पाठ फिरवल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत त्यामुळे याचा त्यांना फटका बसू शकतो का हा प्रश्न आहे तर शाहू छत्रपती यांचं दत्तक प्रकरण प्रचंड गाजलं आहे शिवाय शाहू छत्रपती यांना डमी उमेदवार म्हणून उभा केलं आहे अशीही त्यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून टीका होत असते.
शिवसेनेच्या मशाल चिन्हावर शाहू महाराजांनी निवडणूक लढवावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, ही जागा काँग्रेसला गेल्यामुळे त्यांना याच पक्षातून तिकीट देण्यात आले. काँग्रेसच्या पहिल्याच यादीत यांची उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांना प्रचारासाठी सुरुवातीचा अवधी मिळाला याउलट मंडलिक यांना उमेदवारीसाठी झगडावं लागलं होतं. आता दोघांनीही प्रचाराचं रान उठवलं आहे. इथली लढत ही चुरशीची लढत असल्याने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा घेऊन वातावरण बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला. सद्यस्थितीत या मतदारसंघात महाविकास आघाडीकडे तीन आमदारांचं बळ आहे तर महायुतीकडे तीन आमदार आहेत.
या निवडणुकीतील कळीचे मुद्दे
या मतदार संघात अनेक वर्षांत एकही मोठा नव्या प्रकारचा उद्योग आला नाही. इलेक्ट्रॉनिक्समधील उद्योगाची गरज भासते. पंचगंगा नदीच्या प्रदूषणाकडे सर्वच पक्षांकडून कमालीचं दुर्लक्ष झाल्याचं दिसून येत आहे. नुसते आराखडे करण्यातच अनेक वर्षे गेली परंतु त्याचा पाठपुरावा झाला नाही. वाढते शहरीकरण प्रचंड मोठ्या प्रमाणात असलं तरी पायाभूत सुविधांची कमतरता आहे. साखर, गूळ, दुग्ध व्यवसाय हा जिल्ह्याच्या अर्थकारणाचा कणा असला तरी त्याचा अभ्यास करणारी राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावरील संशोधन संस्था आणण्याचे याठिकाणी प्रयत्न होत नाहीत.
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय मंडलिक हे तब्बल 2,70,568 मतांनी विजयी झाले होते. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक उभा होते. या निवडणुकीत मंडलिक यांना 7,49,085 मते तर महाडिक यांना 4,78,517 मते मिळाली होती. आता येणाऱ्या निवडणुकीत महायुतीकडून मंडलिक यांना मैदानात उतरवण्यात आलं आहे तर कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातील शाहू छत्रपती महाराज यांना उभा केलं आहे त्यामुळे कोल्हापूरची जनता आता इथले सर्व प्रश्न विचारात घेऊन खासदार ठरवतात की आणखी वेगळ्या मुद्द्यावरून ठरवतात हे पाहणं महत्वाचं ठरेल.