लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सध्या रंगात आलीये. फक्त राजकीय नेतेचं नाहीत तर विविध क्षेत्रातील दिग्गज व्यक्तिमत्त्वही यंदा निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहेत. सुप्रसिद्ध गायक नंदेश उमप हे सुद्धा यंदा लोकसभा निवडणुकीला उभे राहिले आहेत. ईशान्य मुंबईतून नंदेश उमप यांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. बहुजन समाजवादी पक्षाच्या वतीने नंदेश उमप निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघात नंदेश उमप यांच्यासमोर महायुतीचे मिहिर कोटेचा आणि महाविकास आघाडीचे संजय दीना पाटील यांचं आव्हान असणार आहे.
निवडणूक अर्ज भरल्यानंतर नंदेश उपम यांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. ‘नव्या इनिंगला सुरूवात झालीय. मनात खूप चांगली भावना आहे.गाणे तर चालू आहेच, पण ही इनिंग लढायला काय हरकत आहे. म्हणून लढतोय. माझा जन्मच विक्रोळीत झालाय. तिथं आमची माणसं आहेत. तसंच सर्वच जातीधर्माची माणसं आहेत. मला लोक ओळखतात. बाबांनी केलेले काम आहे तिथे. म्हणून तेथून लढतोय. तर बसपाने मला लढण्याची ऑफर दिली म्हणून बसपातर्फे लढतोय.’ असं नंदेश उमप यांनी म्हंटले आहे.
‘बाबासाहेबांची ऊर्जा घ्यायला मी चैत्यभूमीवर आलोय. सर्वांची प्रेरणा घेवून लढतोय. रसिकांनी माझ्या गाण्यावर प्रेम केलंय. ते मला इथंही साथ देतील. कलाकारांचा मुद्दा दिल्लीत मांडायचा आहे. मी लढणार आहे. मी थांबणार नाही. समोरचे लोकही चांगले आहेत.परंतु हमभी किसीसे कम नही.’ असं म्हणत नंदेस उमप यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारांना आवाहनंही दिलंय.
कोण आहेत नंदेश उमप?
- नंदेश उमप हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय लोकशाहीर आणि गायक आहेत.
- ते सुप्रसिद्ध शाहीर विठ्ठल उमप यांचे पुत्र आहेत.
- लोकसंगीताच्या क्षेत्रातील आघाडीचे कलाकार म्हणून नंदेश यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
- दिवगंत लोकशाहीर विठ्ठल उमप यांनी त्यांच्या घराण्यात रुजवलेली लोकसंगीताची गायकी त्यांच्या पश्चात नंदेश यांनी सांभाळली.
- विठ्ठल उमप यांच्या निधनानंतर त्यांच्या गाजलेल्या जांभूळ आख्यानाची धुराही नंदेश यांनी समर्थपणे सांभाळली.
- फक्त पोवाडा किंवा लोकसंगीतच नाही तर नंदेश यांनी गझल गायक म्हणूनही ओळख कमावली आहे.
- याशिवाय त्यांनी उडत्या चालीचीही गाणी गायली आहेत.
- ‘कोक स्टुडिओ’मध्ये त्यांनी गायलेलं दार उघड बया असो किंवा सुंबरान मांडलं असो किंवा ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ ‘महाराजांची कीर्ती बेफाम’ हा पोवाडा आजही लोकांच्या लक्षात आहे.
-त्यांच्या गायकीसाठी त्यांना आजवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.