तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज व तत्वज्ञ संत श्री तुकाराम महाराज यांचे तत्वज्ञान, युगपुरूष स्वामी विवेकानंद यांच्या विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयाचा संदेश व विश्वशांतीचा संदेश यशस्वीरित्या जगभर पोहचवून एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष व युनेस्को अध्यासनाचे प्रमुख व विश्वशांतीदूत प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ गुरूवार, २ मे २०२४ रोजी मायदेशी दाखल झाले.
विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ १८ ते ३० एप्रिल या कालावधीत यूके आणि अमेरिका येथे रवाना झाले होते. या शिष्टमंडळात एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. राहुल वि. कराड, कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एन.पठाण, डॉ. महेश थोरवे व अधिष्ठाता प्रा. मिलिंद पात्रे उपस्थित होते.
अमेरिकेतील ब्रिगहॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे डॉ. कराड यांना मानद डी.लिट.पदवी
गुरूवारी २५ एप्रिल रोजी अमेरिकेतील, उटाह राज्यातील ब्रिगहॅम यंग युनिव्हर्सिटीतर्फे (बीवाययू) शिक्षण आणि मानवतेच्या दीर्घकाळ समर्पित सेवेसाठी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना मानद डी.लिट. पदवी प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
यावेळी बीवाययूचे अध्यक्ष सी शेन रीस यांनी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील उत्तुंग कार्याचे कौतूक केले. तसेच आंतरधर्मीय संवादातून विश्वशांती स्थापन करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांचे समर्थन केले.
डीलिट स्विकारल्यानंतर प्रा.डॉ.विश्वनाथ दा. कराड म्हणाले,“ शिक्षणात वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षणाचा अंतर्भाव करणे गरजेचे आहे. त्यातूनच वसुधैव कुटुम्बकम आणि विश्व बंधुत्वाचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल. मन, बुद्धी, आत्मा आणि शरीर हे निसर्ग तत्व आहे. आज शरीर आणि बुद्धी यावर सखोल संशोधन होत आहे. परंतू आत्मा आणि मनाच्या शिक्षणाचा विचार झालेला दिसत नाही. जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्म्याचा अभ्यास होणे गरजेचे आहे.” आयोजित दीक्षांत समारंभात सुमारे २५ हजार नागरिक उपस्थित होते.
अमेरिकेतील ऑर्ट इन्स्टीट्यूट ऑफ शिकागो येथील फुलरटन हॉलः
२१ एप्रिल रोजी अमेरिकेतील ऑर्ट इन्स्टीट्यूट ऑफ शिकागो येथील फुलरटन हॉल ज्या ठिकाणी स्वामी विवेकानंद यांनी ११ सप्टेंबर १८९३ रोजी जागतिक धर्म संसदेदरम्यान जे ऐतिहासिक भाषण केले त्या ठिकाणी विश्वधर्मी प्रा.डॉ. कराड यांनी भारताचे थोर सुपुत्र स्वामी विवेकानंद यांचा पुतळा बसविण्याचा संकल्प घेतला. येथे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की,“ भारतीय तत्वज्ञान हे त्याग, भक्ती, आपुलकी आणि सदभावना यावर आधारित आहे. परंतु दुर्देवाने जगभरात उच्च प्रगत शैक्षणिक प्रणालीमुळे या पैलूला बगल दिली गेली आहे. ११ सप्टेंबर १८९३ रोजी जागतिक धर्म संसदेत भारताचे महान पुत्र स्वामी विवेकानंद यांनी बोललेले भविष्यसूचक शब्द केवळ विज्ञान आणि धर्म/अध्यात्म यांचे एकत्रिकरणच मानवजातीत सुसंवाद आणून शांती निर्माण करेल.”
ऑक्सफोर्डमध्ये ‘मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती’ यावर गोलमेज परिषदः
१९ एप्रिल रोजी लंडन येथील ऑक्सफोर्डमध्ये आयोजित ‘मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धती’ यावरील गोलमेज परिषदेत प्रा. डॉ. कराड म्हणाले,“आज जगामध्ये दहशतवाद, घातपात, रक्तपात, जातीय व धर्मवादामुळे अशांतता व भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे कमी करण्यासाठी शिक्षण पद्धतीत वैश्विक मूल्याधिष्ठीत शिक्षण पद्धतीचा अवलंब करणे गरजेचे आहे. त्यातुनच विश्वशांतीचे वातावरण निर्माण होण्यास मदत होईल.”
“जगात शांती नांदायची असेल तर अध्यात्माबरोबरच मन आणि आत्माचा अभ्यास होणे गरजचे आहे. तसेच मनाचे रसायनशास्त्र आजपर्यंत कोणालाही कळलेली नाही. त्यासाठी आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये मनाच्या शास्त्राचा समावेश करावा.”
या परिषदेमध्ये वॉर्विक येथील लॉर्ड टेलर, थोर शिक्षणतज्ञ डॉ. नील हॉक्स, लंडन येथील तथागत गौतम बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे विचारवंत डॉ. गौतम चक्रवर्ती, लंडन स्थित इंडियन हाय कमिशनच्या डॉ. निधी चौधरी, केंब्रिज विद्यापीठाचे ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. ब्रायन फोर्ड, स्वित्झरलँड येथील डॉ. जेफ्री क्लेमेंटस हे सहभागी झाले हेाते.
आयोजित पत्रकार परिषदेत एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, संचालक डॉ. महेश थोरवे, विश्वशांती विभागाचे अधिष्ठाता प्रा. मिलिंद पात्रे उपस्थित होते.