लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी सध्या देशभरात मतदान सुरू आहे. महाराष्ट्रातील हायव्होल्टेज असणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातही आज मतदान पार पडतंय. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या ननंद भावजईच्या लढाईमुळे बारामतीतील लढत चर्चेचा विषय ठरत आहे. अशा परिस्थितीत आता ऐन मतदानाच्या दिवशी बारामती लोकसभेच्या लढाईत मोठा ट्विस्ट आल्याचं समोर आलं आहे. बारामती लोकसभेतील महाविकासआघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे या मतदानाच्या दिवशी आपल्या मतदानाचा हक्क बजावल्यानंतर थेट अजित पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी दाखल झाल्या.
बारामती लोकसभेत मतदान सुरू असतानाच अजित पवार आणि त्यांच्या मातोश्री या काटेवाडीतील त्यांच्या घरी आहेत. अशा परिस्थितीत अजित पवार आणि त्यांच्या मातोश्री आशा पवार यांना भेटण्यासाठी सुप्रिया सुळे एकट्याच काटेवाडीत पोहोचल्या. या भेटीमुळे बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. भेटीपूर्वी सुप्रिया सुळे यांनी मतदान केलं आहे. सुप्रिया सुळे हे अजित पवारांच्या घरी जाणं हे मोठं प्रातिनिधीक आहे. कारण या भेटीचा परिणाम नक्कीच मतदारांवर होईल, असं राजकीय विश्लेषक सांगतात. पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत असताना दोन्ही नेते कुटुंब म्हणून एक राहणार असतील, तर मतदार किंवा कार्यकर्ते नक्कीच विचार करतील असंही अनेक राजकीय जाणकारांचं मत आहे. बारामतीमध्ये मतदान सुरु होऊन अवघे चार तास उलटले आहेत. भेटीनंतर मतदानाचे आणखी सात तास शिल्लक आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या भेटीचा मतदानावर काय परिणाम होणार, हे आता पाहावं लागेल.