बीड | मागील काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात आरक्षणाचा मुद्दा केंद्रस्थानी होता. याच मुद्द्यावरून महाराष्ट्रात अनेक आंदोलने करण्यात आली होती. आरक्षण मागणी आंदोलनानंतर बीड लोकसभा मतदार संघातील बहुतांश ठिकाणी मराठा जातीचं ध्रुवीकरण, त्यातून निर्माण होणारा रोष दिसून आला तर दुसऱ्या बाजूला त्याची प्रतिक्रिया म्हणून एकवटलेला ओबीसी मतदार असल्याचे पाहायला मिळालं. बीड लोकसभा मतदारसंघातील यंदाच्या निवडणुकीतही पारंपारिक जातीय समीकरणं महत्वाची असणार आहे. ती कशी? आणि याचा फायदा कुणाला होऊ शकतो? यासंदर्भात जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ पाहा…
या मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्यात मुख्य लढत होणार असून ती अटीतटीची असणार आहे मात्र बीडची निवडणूक राष्ट्रीय मुद्दयांवर कमी पण जातीय मुद्द्यावर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे याचं कारण बीड लोकसभेच्या रिंगणात मराठवाड्यातील सर्वाधिक म्हणजे ४१ उमेदवार असणार आहे. त्यात मुस्लिम समाजाचे, मराठा समाजाचे आणि इतर समाजाचेही उमेदवार आहेत. त्यामुळे मतांची वजाबाकी करण्याचा पद्धतशीर प्रयत्न इथं दिसून येत आहे. या जातीय समीकरणात मराठा आणि ओबीसी समाज गुरफटलेला असताना निवडणुकीनंतर उसवलेली ही सामाजिक वीण दुरुस्त करण अवघड होऊन बसेल असं वातावरण सध्या बीडमधील गावोगावीच नाही तर राज्यात निर्माण झालं आहे त्याचे पडसात म्हणून मतदारसंघनिहाय आता बेरीज-वजाबाकी सुरू झालीय…
दरम्यान गेल्या पाच वर्षात भाजप सत्तेत असताना पंकजा मुंडे यांना सत्तेतील कोणतेही पद देण्यात आले नव्हते. आता जर नेतृत्व उभे करायचं असेल तर ही निवडणूक प्रतिष्ठेची करण्याशिवाय पर्याय नसल्याचीही भावना ‘ओबीसी’ समाजामध्ये दाटलेली आहे. आता आरक्षण केंद्रबिंदू मानून रचल्या गेलेल्या राजकीय पटलावर कोण सरस ठरणार याची उत्तरे इथल्या निकालानंतरच मिळतील.