अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीतून भाजपचे डॉ. सुजय विखे पाटील विरुद्ध महाविकास आघाडीकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके असा चुरशीचा सामना रंगतो आहे.जसजशी मतदानाची तारीख जवळ येत आहे तसं तसं या मतदारसंघात राजकीय वातावरण तप्त होऊ लागलंय. गेल्या तीन निवडणुकांत या मतदारसंघात भाजपने सलग विजय मिळवला आहे आणि आता ही परंपरा कायम राखण्यासाठी भाजपचा जोरदार प्रयत्न सुरु आहे.. पण यावेळी ही परंपरा कायम राहणार की बदलणार ? सुजय विखे यांच्यासाठी ही निवडणूक आव्हानात्मक बनली आहे का ? याच संदर्भात आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ.
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा समस्यांनी प्रचंड ग्रासलेला, दुष्काळी, रोजगार, सिंचन, रस्ते, आरोग्य अशा मुलभुत प्रश्नांनी व्यापलेला आहे… प्रत्यक्ष निवडणूक लढणारे आणि ती पडद्याआडून खेळणारे सर्वच कधीना कधी सत्ताधारी होते. पण निवडणूक प्रचारातून या प्रश्नांची चर्चा होताना दिसत नाही. गतकाळाचे संदर्भ देत एकमेकांची उणीदुणी काढणे, समाजमाध्यमांचा आधार घेत हिणवणे, प्रचारफेरीतील कार्यकर्त्यांकडून मारहाण होणे या प्रकारांमुळे निवडणूक प्रचारची पातळी खालावली आहे.इथं वंचित बहुजन आघाडीचा तिसरा उमेदवार फारसा प्रभावी ठरणार नसल्याने विखे विरुद्ध लंके अशीच थेट लढत आहे.
शरद पवार, प्रकाश आंबेडकर यांनी विखे पितापुत्रांविरोधात गौप्यस्फोट करत खळबळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांचे हे अस्त्र विखे यांनी परतवून लावले. पक्षातील आणि पक्षाबाहेरील नाराजांची मोट बांधण्यासाठी विखे यांना बरेच प्रयत्न करावे लागले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. बाळासाहेब थोरात यांनी त्यांची शिर्डी मतदारसंघातील यंत्रणाही विखेंविरोधात नगर मतदारसंघात उतरवली आहे. समाजमाध्यमांचा आधार घेत नीलेश लंके यांनी हवा निर्माण केली आहे पण, ती मतात परावर्तित करण्याचं कसब त्यांना दाखवावं लागणार आहे.या लोकसभा मतदारसंघात नगर शहर, ,शेवगाव, कर्जत-जामखेड,राहुरी, पारनेर आणि श्रीगोंदा हे ६ विधानसभा मतदारसंघ येतात.
शेवगावमधून भाजपच्या मोनिका राजळे आमदार आहेत.राहुरीतून प्राजक्त तनपुरे, कर्जत-जामखेडमधून रोहित पवार,पारनेरमधून निलेश लंके आमदार आहेत. हे तिघेही शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत.अहमदनगर शहरमधून संग्राम जगताप आहेत ते अजित पवारांसोबत आहेत.श्रीगोंद्यातून भाजपचे बबनराव पाचपुते आमदार आहेत.आता यातील आमदार रोहित पवार यांना मतदारसंघाऐवजी राज्य पातळीवर अधिक स्वारस्य आहे. मतदारसंघात विखे यांच्याकडे भाजपशिवाय स्वतःची यंत्रणा आहे.
लंके यांना घटक पक्षांवर अवलंबून रहावे लागत आहे. शरद पवार व बाळासाहेब थोरात यांनी नगर मतदारसंघात लागोपाठ सभांचा धडाका लावला तर विखे यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतल्या. मोदी यांच्या सभेला झालेली गर्दी लक्षणीय होती.सुजय विखे यांच्या कार्यपध्दतीने निर्माण झालेली नाराजी आपल्याकडे वळवण्याचा नीलेश लंके यांचा प्रयत्न राहीला आहे तर सुपा औद्योगिक क्षेत्रातील अशांततेला विखे यांच्याकडून लंके व समर्थकांना जबाबदार धरलं जात आहे.
नगर शहराला दिवसाआड होणारा पाणीपुरवठा, नगर-पुणे इंटरसिटी रेल्वे, नगर-बीड-परळी रेल्वेमार्ग, ताजनापूर टप्पा-२ प्रकल्प, रोजगारासाठी होणारे तरुणांचे स्थलांतर असे अनेक प्रश्न मतदारसंघात वर्षानुवर्षे खोळंबलेले आहेत. यापूर्वीच्या निवडणुकांतून त्यावर वेळोवेळी आश्वासने दिली गेली मात्र, प्रश्न ‘जैसे थे’ आहेत.अशात सुजय विखे पुन्हा एकदा खासदार होण्यात किती यशस्वी होतात..समोरच्या आव्हानाला कशी मात देणार.. आणि महत्वाचं नगरकर कुणाला संधी देणार हे समजण्यासाठी आपल्याला ४ जूनची वाट पाहावी लागेल.