ठाणे | शिवसेना आणि ठाणे हे समीकरण आता महाराष्ट्रासाठी नवं नाही परंतु राज्यात बदलत्या घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात सारं काही आलबेल आहे असंही म्हणता येणार नाही. सगळे नेते, कार्यकर्ते आता चौथ्या टप्याच्या निवडणुकीसाठी जोमाने प्रचार करताना दिसून येत आहे. अशातच ठाणे लोकसभा मतदार संघात ठाकरेंच्या शिवसेनेने नवी रणनीती आखलीय ती काय आहे याच संदर्भात जाणून घेण्यासाठी सदर व्हिडीओ पाहा…
ठाण्यातून शिंदेंच्या शिवसेनेतून नरेश म्हस्के यांना उमेदवारी देण्यात आलीय तर त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेतून विद्यमान खासदार राजन विचारे यांना तिकीट दिल आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातील मतदान २० मे ला होणार आहे. त्या अनुषंगाने दोन्ही नेत्यांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेतून नवी रणनीती आखण्यात आली आहे.
नवी मुंबई विमानतळाला दिनकर बाळू पाटील म्हणजे दि.बा.पाटील यांचं नाव देण्याचा प्रलंबित प्रस्ताव, याच भागातील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यासाठी निर्माण झालेली अडसर आणि भाजपच्या तिकीटावर पुन्हा एकदा खासदार होण्याचे स्वप्न पाहणारे माजी खासदार संजीव नाईक यांची उमेदवारी डावलली गेल्याने आगरी, कोळी, प्रकल्पग्रस्त समाजात असलेली नाराजी या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन ठाकरेंच्या शिवसेनेने ठाण्यात या समाजाच्या ध्रुवीकरणाचे प्रयत्न सुरू केल्याचं दिसून येत आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने बदल होत असला तरी या भागात असलेल्या आगरी कोळी समाजाचे मतदान नेहमी वैशिष्ठपूर्ण राहिलय. ठाण्यातील बाळकूम, कोलशेत, ढोकाळी, वाघबील, ओवळा, कासारवडवली याशिवाय मिरा भाईंदर भागातील उत्तन तसेच आस-पासच्या परिसरात अजूनही मोठ्याप्रमाणावर आगरी कोळी समाजाची वस्ती आहे. विशेष म्हणजे उत्तन भागात एक मोठा समाज मासेमारीवर अवलंबून आहे…या भागात जेट्टी उभारणे, मासेमारीसाठी पेट्रोल दिवे उभे करून देणे अशी काही कामे खासदार विचारे यांनी गेल्या १० वर्षांत केलीय त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी केलेल्या कामाचा त्यांना फायदा होईल का असा प्रश्न आहे.