महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत दोन्ही बाजूंकडून जोरदार वार-पलटवार होताना पहायला मिळत आहेत. अशातंच आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील पारनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार निलेश लंकेंना थेट इशारा दिलाय. महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, तू किस झाड की पत्ती है असं म्हणत अजित पवारांनी निलेश लंकेंवर हल्लाबोल केलाय.
निलेश लंके यांचे होम ग्राऊंड समजल्या जाणाऱ्या पारनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ अजित पवारांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेतून अजित पवारांनी थेट निलेश लंकेंवर जोरदार टीका केली. गेल्या विधानसभेत माझी चूक जाली. मी चुकीचा उमेदवार दिला. मला वाटलं नव्हतं बाबा असे दिवे लावेल. गडी दिसायला बारीक दिसतो, मात्र लय पोहोचलेला आहे. मला त्यावेळी घरी घेऊन गेला. कसं साधं घर आहे, कसे साधे आई-वडील आहेत हे सांगितलं. आमदार झाल्यावर त्याची एक एक लक्षण कळायला लागली. अधिकाऱ्यांना देखील धमक्या देत होता. आम्ही उपमुख्यमंत्री असूनही जिल्हाधिकाऱ्यांशी व्यवस्थित बोलतो आणि हा पट्ट्या पोलिसांनाही तुमचा बाप येतोय अशी धमकी देतो. अरे निलेश बेटा, तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा हेडमास्तर मी आहे. तू जर माझ्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या आणि मी जर तुझ्या मागे लागलो तर, आमच्या ग्रामीण भागात एक शब्द आहे कंड जिरवतो, तुझा असा कंड जिरवेन की तुला सतत अजित पवार डोळ्यासमोर दिसेल. माझ्या नादी लागू नको, महाराष्ट्रात जे जे माझ्या नादी लागले त्यांचा पुरता बंदोबस्त मी केलाय. तू तर किस झाड की पत्ती. मी जोपर्यंत शांत आहे तोवर शांत आहे. असं म्हमत अजित पवारांनी थेट निलेश लंकेंना इशारा दिलाय.
शिवाय, लोकसभा निवडणुकीत या निलेशचा बंदोबस्त करायचा म्हणजे करायचा. अजूनही कोणी दहशतीत असेल तर त्याला जाऊन सांगा अजित पवार आला होता व तो आपल्या पाठीशी आहे. आपल्या आमदाराने राजीनामा दिला आता कोण वाली हे समजू नका. पालकमंत्री विखे आता आपल्यासोबतच आहेत. महाराष्ट्राला दाखवून द्या हा फुगा होता. इथले नगराध्यक्ष मला येऊन भेटले त्यांनी सांगितलं. मी त्यांना म्हणालो इतके दिवस गप्प का? आधी बोलले असते तर आधीच बंदोबस्त केला असता. गडी पुरता वाया गेलाय, आता त्याला घरी पाठवल्याशिवाय पर्याय नाही. 4 जूनला पेट्या उघडल्यावर हे लंकेचा पार्सल घरी पाठवण्याचं काम करा. असं म्हणत अजित पवारांनी यावेळी मतदारांनाही आवाहन केलं. त्यामुळे आता अजित पवारांच्या या वक्तव्यानंतर अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील लढाई चांगलीच रंगणार असल्याचं बोललं जातंय.