अहमदनगर | आज तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्यात अहमदनगरचाही समावेश आहे. या लोकसभेत महायुतीचे उमेदवार सुजय विखे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यात लढत होत आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष या मतदारसंघात लागून आहे. काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पारनेर येथील सभेत मविआचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर जोरदार टीका केली होती त्यावर लंके यांनी पवारांना प्रतिऊतर दिल आहे.
अजित पवार काय म्हटले होते?
महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा मी बरोबर बंदोबस्त केलाय, मग तू किस झाड की पत्ती है, माझ्या नादी लागलास तर तुझा असा कंड जिरवेन की सगळीकडे तुला अजित पवारच दिसेल, असं अजित पवारांनी म्हणत निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला.
निलेश लंके यांनी पवारांना काय प्रत्युत्तर दिले?
दादांना मी फोन करून विचारणार आहे. दोन दिवस निवडणुक होऊ द्या, मग पाहू. अजित पवार यांचे भाषण सुरू असताना त्यांना खाली बसलेल्या लोकांकडून चिठ्ठी दिली जात होती त्यामुळे ते बोलले असतील. आपण एखाद्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जात असतो तेव्हा त्याच्याबाबतीत सकारात्मक बोलणे अपेक्षित असते अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिली आहे.
दरम्यान, सत्ताधारी पक्षाने मोदींच्या नावावर मत मागण्यापेक्षा स्वतःच्या कामावर मत मागणे अपेक्षित होते. मात्र तसे काही झाले नाही म्हणजे त्यांना त्यांचे अपयश दिसून आले आहे. ज्या वेळेस माणूस दुसर्याचा आधार घेतो त्यावेळेस आपल्याकडे काही राहिलेले नसते, असा टोला लंके यांनी सुजय विखे पाटलांना लगावला आहे.