लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम अंतिम टप्प्याकडे आलाय.महाराष्ट्रात शेवटच्या पाचव्या टप्प्यातील मतदान येत्या २० मे रोजी होत आहे.प्रचार शिगेला पोहचला आहे.महाराष्ट्रातल्या ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान झालं.त्यातला हा पाचवा टप्पा आहे.चार टप्पे पूर्ण झाले आहेत. अशात प्रचारादरम्यान दररोज एकमेकांवर नवनवीन आरोप-प्रत्यारोप होताना दिसतात.तसंच अनेक मुलाखतीतून मोठे गौप्यस्फोट होतात.अनेक दिग्ग्ज नेते प्रसार माध्यमांना मुलाखती देत आहेत. आताही माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एका मुलाखतीत शरद पवारांवर मोठं वक्तव्य केलं.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, पवारांना त्यांच्या चुकांची फळं भोगावी लागतायत. मुलाखतीत ज्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांना शरद पवार आणि अजित पवार यांचा फोटो दाखवण्यात आला त्यावेळी ते म्हणाले, ‘पवार साहेबांनी खूप मोठ्या चूका केल्या. अजित पवारांनी मी मुख्यमंत्री असताना राजीनामा दिला, नंतर अनेकवेळा असं केलं. पण, दरवेळेस त्यांना पुन्हा बोलावून शरद पवार आणखी मोठं पद देत गेले. त्याचीच फळं आता त्यांना भोगावी लागत आहेत.’ असं ते स्पष्ट बोलले.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्रादेशिक पक्षांबरोबर छोटे पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलीन होतील असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं.शरद पवारांच्या विलीनीकरणाच्या या वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण थेट बोलले होते. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, पवारांनी ते वक्तव्य माझ्या समोर केलं होतं.देशात लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ जूनला लागत आहेत. त्यानंतर देशात इंडिया आघाडीचं सरकार येण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळी प्रादेशिक पक्ष आणि छोटे पक्ष सत्तेतल्या वाट्यासाठी आघाडीत येतील. किंवा काही जण काँग्रेसमध्ये विलीन होती असं चव्हाणयांनी म्हटलं होतं. मोठ्या प्रमाणात असलेले प्रादेशिक पक्ष जनतेला काही आवडत नाही. अमेरीकेत किंवा इंग्लडमध्ये दोनच पक्ष आहेत. त्या दिशेने देशाची वाटचाल होईल असंही चव्हाण म्हणाले. शरद पवार जे काही म्हणाले त्यांच्या भावनेशी आपण समहमत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. मात्र त्यासाठी ४ जूनची वाट पाहाली लागेल असं सुचक वक्तव्यही चव्हाण यांनी केलं होतं.त्यानंतर आता पवार साहेबांनी खूप मोठ्या चूका केल्या.असं थेट शरद पवार यांच्याबाबत पृथ्वीराज चव्हाण यांनी विधान केलं आहे. चव्हाण यांच्या वक्तव्यावर शरद पवार काय प्रत्युत्तर देणार हे पाहावं लागेल.