लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना खऱ्या अर्थाने अग्निपरीक्षेला सामोरी जात आहे. कारण याच निवडणुकीतून असली नकली शिवसेनेचा फैसला होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेपेक्षा अधिक जागा आणि अधिक मतं घेतल्यास आम्हीच खरे असल्याचं सांगत न्यायालयीन लढ्यात आमदार अपात्रतेच्या लढ्याला हा निकाल बळ देणारा ठरेल तर जागा जिंकता न आल्यास ठाकरेंवर विश्वास असणाऱ्या शिवसैनिकांना भावनिक धक्का बसेल.त्यामुळे ही निवडणूक असली नकली शिवसेनेचा फैसला करणारी नेमकी कशी ठरेल ? हेच या व्हिडिओतून जाणून घेऊ.
शिवसेनेत पडलेल्या उभ्या फुटीनंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष २१ जागा, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातली शिवसेना १५ जागा लढवत आहे. यातल्या कोणत्या जागांवर मतदान झालं आहे ते आपण पाहिलं आहे..आणि कुठं बाकी आहे ते ही पाहिलं आहे..आता जनसमर्थन कुणाला हे निकाल दाखवणार आणि जनता कुणाच्या पाठिशी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या लढाईत मांडला जाणार. पक्षाचा प्रतोद कोण, पक्षादेश झुगारून आमदार पळाले, त्यांचा निर्णय अपात्रता ओढवणारा आहे का? असे कळीचे विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना निकालाचा अर्थ पुढच्या युक्तिवादातही महत्वाची भूमिका बजावेल.
शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई न्यायालयातही लढली जात आहे. आम्ही जास्तीत जास्त मतं मिळवून न्यायालयात खरी शिवसेना आमचीच हा युक्तीवाद सुरु करु, असं या न्यायालयीन लढाईची सूत्रं सांभाळणारे नेते अनिल परब सांगत आहेत. मताधिक्य जास्त असावं, यासाठीच दोन्ही गटांनी जास्तीतजास्त जागा लढता याव्यात, यासाठी आग्रह धरला होता. शिवसैनिक पेटून उठावा, त्याने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदावरुन खाली खेचणाऱ्या महायुतीच्या विरोधात मतदान करावं यासाठी संपर्क अभियानावर जोर दिला जात आहे.भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्यात तुलना केली तर आम्ही सरस आहोत. आमच्याकडे मोदी यांचं नेतृत्व आहे, हिंदुत्व आहे आणि जनतेच्या भावना, असं भाजप नेते आशिष शेलार नमूद करतात. आम्ही नक्की जिंकू, उद्धव ठाकरे गटाच्या पुढे असू, असं ही त्यांचं म्हणणं आहे..तर अनिल परब यांचं मत वेगळं आहे. २०१४ मध्ये युती अचानक तुटली. प्रचाराला वेळच मिळाला नाही, आता तसं नाही. आमच्यावर झालेला अन्याय लोकांना ज्ञात आहे. प्रचाराला भूमिका स्पष्ट करायला पुरेसा अवधी मिळाला आहे, असं परब यांचं म्हणणं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप आहे. शिवसेनेने जास्त जागा लढण्यास भाजपचा आक्षेप होता. मात्र नंतर न्यायालयीन लढ्याची व्याप्ती, पक्षाच्या मान्यतेसाठी आवश्यक असलेली मतं लक्षात घेता जास्त जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला असं भाजप नेते स्पष्ट करतात. मुंबईतील मराठी मतं नेमकी कुठं जातील यावरही बरंच काही अवलंबून असेल. उद्धव ठाकरे समर्थकांचं म्हणणं आहे की आमदार तिकडे गेले असले तरी सामान्य शिवसैनिक आमच्याकडे आहेत. शिवसेना म्हणते मुंबईतले नगरसेवक बहुसंख्येने आमच्याकडे येत असताना जनतेच्या मनात काय आहे, ते स्पष्ट दिसतंय.त्यामुळे दोन्ही पक्षांत जास्त जागा कोण जिंकणार हे या निवडणुकीतून स्पष्ट होणं फार महत्वाचं झालं आहे. कारण विधानसभेच्या जागावाटपात आपापल्या आघाडीत कुणाला किती जागा मिळणार हे त्यावरच ठरणार आहे.आणि त्यामुळेच ही लोकसभा निवडणूक असली आणि नकलीचा फैसला सांगणारी ठरेल.