मुंबई | आज लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मतदान पार पडत असताना महाराष्ट्रातील एकूण १३ लोकसभा मतदार संघातील निवडणूक अटीतटीची असणार आहे. या निवडणुकीत बड्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या निवडणुकीच्या प्रचारात अनेकदा सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. आज मतदानाच्या दिवशी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर टीका केली. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
या निवडणुकीत दुर्दैवाने काही फतवे निघत आहेत…मात्र, आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन पुढे जात आहोत. जे काही जाती-जातीत विष कालवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना महाराष्ट्रातील जनता थारा देणार नाही. या निवडणुकीत जनता त्यांना घरचा रस्ता दाखवेल. जी कामं काँग्रेसने ५० वर्षात केली नाही ती कामे मोदींनी १० वर्षात केली त्यामुळे विरोधकांना त्यांची जागा मतदार दाखवतील आणि मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करतील. या निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. मुख्यमंत्री पदाच्या मुद्यावरुन बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, ते (उद्धव ठाकरे) तोंडावर कधीच आपटले आहेत. आता त्यांची तोंड फुटतील”, असा हल्लाबोल त्यांनी ठाकरेंवर केला आहे.
आज राज्यातील शेवटच्या टप्यात मतदान पार पडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं असे आवाहन केले आहे. शिवाय आपलं एक मत इतिहास घडवेल. ही निवडणूक खऱ्या अर्थाने देशाच्या विकासाची आहे. या देशाचं पुन्हा एकदा नेतृत्व करण्यासाठी नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी देशातले सर्वजण आतूरले आहेत. देशाच्या विकासासाठी ही निवडणूक असून नागरिकांनी मतदान करत आपला हक्क बजवावा, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
विरोधकांकडून बोगस मतदान होत असल्याच्या आरोपावर बोलताना, बोगस मतदार आणण्याची आम्हाला गरज काय? ठाण्यात आम्ही जे काम केलं, शिवसेना आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा हा बालेकिल्ला आहे. या ठाण्यावर बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेम केलेलं आहे. गेले अनेक वर्ष आम्ही ठाण्यात काम करत आहोत. ठाणे हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. मतदार आजच्या दिवसाची वाट पाहत होते. ज्यांनी टीका केली त्यांनी हत्यार खाली टाकलेली आहेत. पराभवाची चाहूल त्यांना लागली आहे. ज्यावेळी पराभवाची चाहूल लागते, तेव्हा अशा प्रकारची विधाने ऐकू येतात असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.