पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका आलिशान सुपरकारने दुचाकीला जोरदार धडक दिली आणि या भीषण धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला.रात्री उशिरा पबमधून पार्टी करुन पुन्हा परतत असताना हा अपघात घडला.आता ज्याने दुचाकीला धडक दिली तो अल्पवयीन आहे.त्याने मद्यपान केलं होतं.त्याचे वडील बांधकाम व्यवसायिक आहेत.आरोपी मुलाला अटक करण्यात आली पण विशेष बाब म्हणजे दोन जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या बिल्डरपुत्राला काही तासांतच कोर्टातून जामीन मिळाला.मग यात नेमकी चूक कोणाची? म्हणून सर्व स्तरातून जोरदार चर्चा होऊ लागली.गृह मंत्रालय, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस खातं, पोलिसांना मॅनेज करणारे राजकीय नेते, वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे, दारू न पिल्याचा तत्काळ अहवाल दिल्यामुळे संबंधित विभाग, आश्चर्यजनक निकाल समोर आल्यामुळे न्यायालय देखील नागरिकांच्या घेऱ्यात सापडले आणि संशय बळावत गेले.श्रीमंतांची बटीक झालेल्या व्यवस्थेवर नागरिकांचा दबाव प्रचंड वाढू लागला तशी सर्वच यंत्रणा कामाला लागल्याची दिसू लागली.पण यातून निष्पन्न काय झालं.? तर पैशांच्या जोरावर तुम्ही हवं तसं मॅनेज करू शकता.हा आणखी एकदा मेसेज सर्वदूर गेला.कायद्याच्या राज्याची लक्तरे अशी वेशीवर टांगल्याचे पाहायला मिळाले.या सर्व घटनांतून अखेर चूक कुणाची हा प्रश्न वारंवार विचारला जातोय.हेच आपण या व्हिडिओतून पाहू…
बार आणि पबवरुन परतताना अनेक तरुण मद्यप्राशन करुन गाड्या चालवतात आणि या गाड्यांचा अति वेग असतो. हाच वेग आता तरुणांच्याच जीवावर बेतताना दिसत आहे.कारण अशाच प्रकाराला अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा हे दोघे जण मुकले आहेत.हे दोघे पुण्यात आयटी कंपनीत जॉब करत होते. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्प चे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवालच्या पोर्शे कारने अनिश आणि अश्विनी या दोघा आयटी इंजिनिअर तरुणांचा जीव घेतला आहे. मर्यादित वेगापेक्षा त्याच्या कारचा स्पीड खूप जास्त होता. तो २०० किमी वेगाने रस्त्यावरून ही कार चालवत होता. या अपघातानंतर पळून जाण्याचा प्रयत्न करताच जमावानं चोप देऊन त्याला पोलिसांच्या हवाली केलं.आरोपी वेदांत अग्रवाल हा १७ वर्षांचा आहे.तो चालवत असलेल्या पोर्शे कारला नंबर प्लेट नव्हती. या अपघातानंतर पुण्यातील पब आणि बारना रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवण्यासाठी परवानगी देण्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.त्याचबरोबर पोर्शे सारखी महागडी कार पुण्याच्या रस्त्यांवर नंबर प्लेट शिवाय कशी धावू शकते हा प्रश्नह विचारला जात आहे..
पुण्यातील रस्त्यांवर अनेक आलिशान महागड्या कार बघायला मिळतात. प्रत्येक गाडीला नंबर प्लेट अनिवार्य आहे. मात्र वेदांत अग्रवालच्या गाडीला नंबर प्लेट नव्हती. त्यात तो अल्पवयीन आहे. असं असूनही पुण्याच्या रहदारीच्या रस्त्यावर भरधाव वेगाने गाडी चालवत होता. निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने, बेदरकारपणे गाडी चालवल्याने नियंत्रण सुटलं आणि थेट दोन तरुणांना चिरडलं. गाडीला नंबर प्लेट नाही, परवाना नाही तरीही भरधाव वेगाने गाडी चालवत त्याने वाहतुकीचे सगळे नियम धाब्यावर मारले.आणि असं असताना त्याला अटक केल्यानंतर काही तासांत जामीन मिळाला..पण न्यायालयाने जामीन देताना घातलेल्या अटींवर आश्चर्य व्यक्त करण्यात येतंय.