परभणी | नुकतंचं राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील मतदान पार पडलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीचे मतदान पाच टप्यात झालं आहे. त्यामुळे या पाचही टप्प्यातील मतदार संघातील नेत्यांचं भवितव्य मतपेटीत बंड झालं आहे. या लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे. त्यामुळे अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
याशिवाय, महाविकास आघाडी आणि महायुतीचे नेते आपल्याच अधिक जागा राज्यात येतील असा विश्वास व्यक्त करत आहेत. त्यातच, राज्यातील हाय व्होल्टेज लढत असलेल्या बारामती आणि बीड लोकसभा मतदारसंघाबाबत रासपचे प्रमुख आणि माजी मंत्री महादेव जानकर यांनी भाकीत केलं आहे. तर, परभणी लोकसभा मतदारसंघातून आपलाच विजय होणार असल्याचा दावाही महादेव जानकर यांनी केला आहे.
जानकरांनी बोलताना, राज्यातील निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल सहानुभूती असली तरी महायुतीच्या 42 जागा निवडून येणार, विशेष म्हणजे बीड आणि परभणीमध्ये ओबीसी व मराठा वाद जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. मविआने मुद्दाम हा वाद केल्याचा आरोपही जानकर यांनी केला आहे. काहीही झालं तरी बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवार, बीडमध्ये पंकजा मुंडे, आणि परभणीतून मीच निवडून येणार असल्याचा दावाही जानकरांनी केलाय.
दरम्यान, बीड आणि परभणीत जातीय गणितं दिसून आली. बीडमध्ये मुंडे बहिण-भावाने आपल्या भाषणातून अनेकदा याविषयी बोलून दाखवलं. मराठा आरक्षणाचे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचं केंद्रस्थान असल्याने बीडमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी वाद दिसून आला. त्यातच, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंगण सोनवणे हे मराठा समाजाचे असल्याने मराठा विरुद्ध ओबीसी असे ध्रुवीकरणही येथे पाहायला मिळाले. तर, परभणीतही शिवसेनेचे संजय बंडू जाधव विरुद्ध महादेव जानकर यांच्या लढतीतही जातीय समीकरण असल्याचं दिसून आलं आहे. आता बारामती, बीड आणि परभणीबाबत जानकरांनी केलेलं भाकीत कितपत खरं होतं हे ४ जूनला स्पष्ट होईल.