देशात सर्वात श्रीमंत म्हणून ओळखला जाणारा मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई…कारण या मतदारसंघावर संपूर्ण मुंबईचं नव्हे तर देशाच्या आर्थिक राजधानीचं भवितव्य अवलंबून असतं..सर्व प्रशासक, शासक, राजकीय नेते, उद्योजक, व्यापारी, धनाढ्यांची वसतीस्थानं, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कंपन्या, बँकांची मुख्यालयं, महत्त्वाच्या शाखा, ऐतिहासिक इमारती या भागात आहे आणि या कंपन्या आपला करही इथूनच भरतात. इथं मुंबईचे आद्य निवासी कोळी समाजाची घरंही आहेत आणि नौदलाचं केंद्र आणि बंदरही आहे.असं सगळं असताना हा उच्च्भ्रू लोकांचा मतदारसंघ मतदानात मात्र गरीब राहिल्याचं दिसून आलंय. इथं गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षाही यंदा कमी मतदान झालं आहे…त्यामुळे श्रीमंत मतदारसंघ मतदानात का गरीब राहिला याचीच चर्चा सुरु झाली..याच चर्चेच्या अनुषंगाने इथं मतदानाचा टक्का का घसरला ? हे आपण या व्हिडिओतून जाणून घेऊ.
दक्षिण मुंबईत गेली तीनशे ते साडेतीनशे वर्षं अनेक व्यापारी स्थिरावले. ब्रिटिश, युरोपियन, पारशी, गुजराती, पाठारे प्रभू, ज्यू लोकांनी या भागामध्ये आपली व्यापाराची दुकानं काढली. इथंच कापसाचा व्यापार वाढला, निर्यात इथूनच झाली. मुंबई बंदरामुळे देशातील सगळा माल इथूनच परदेशात पाठवला जात असे.रिझर्व्ह बँक, मुंबई विद्यापीठ, उच्च न्यायालय, चर्चगेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससारखी मोठी रेल्वे स्टेशन्सही इथंच आहेत. महाराष्ट्र विधिमंडळ, मंत्रालय, मुंबईची महानगरपालिका याच मतदारसंघात आहे.विधानसभा मतदारसंघाचा विचार करता मलबार हिल, मुंबादेवी, भायखळा, शिवडी, वरळी, कुलाबा हे सहा मतदारसंघ इथं येतात. मलबार हिल मतदारसंघातून भाजपाचे मंगलप्रभात लोढा विजयी झाले…कुलाबा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपाचेच राहुल नार्वेकर करतात, ते विधानसभेचे अध्यक्ष आहेत. भायखळा मतदारसंघात शिवसेनेच्या यामिनी जाधव विजयी झाल्या..मुंबादेवी इथून काँग्रेसचे अमिन पटेल विजयी झाले. शिवडी इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अजय चौधरी तर वरळीतून आदित्य ठाकरे आमदार झाले…या लोकसभा मतदारसंघात महायुतीत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या यामिनी जाधव विरुद्ध महाविकास आघाडीतून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत यांच्यात लढत झाली…थोडक्यात शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना असा सामना झाला..इथं राज्यातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मतदान झालं..पण खासदार निवडण्यासाठी निम्म्याहून कमी मतदारांनी मतदान केलं…गेल्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षाही यंदा कमी मतदान झाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
इथं २०१९ मध्ये ५०.९७ टक्के मतदान झालं होतं..यावेळेस मतदानाचा टक्का वाढेल, असं अपेक्षित होतं. मात्र यंदा त्यापेक्षा कमी म्हणजे ५०.०६ टक्के इतकंच मतदान झालं…उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, या मतदारसंघात एकूण १५,३२,२२६ मतदारांची नोंदणी झाली होती. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी सगळ्याच विधानसभा मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरल्याचं स्पष्ट दिसून आलं.. विविध मुद्द्यांवर इतर मतदारसंघांत गोंधळ झाला पण इथं कमी गोंधळ होता. मात्र, तरीही मतदान कमी झालं.पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे विधानसभा मतदारसंघ याच लोकसभा क्षेत्रात येतात. लोढा यांच्या मलबार हिल मतदारसंघातून ५१.७७ टक्के मतदान झालं. २०१९ मध्ये इथं सर्वाधिक मतदान झालं होतं. मात्र यावेळी टक्का घसरला. नार्वेकर यांच्या कुलाबा मतदारसंघात ४३.६८ टक्के इतकं सर्वांत कमी मतदान झालं. गेल्या निवडणुकीतही इथं कमी मतदान झालं होतं. त्या तुलनेत आणखी कमी मतदान झालं.दक्षिण मुंबईत गुजराती मतदार जास्त आहेत. अनेक सोसायटीमध्ये राहणारे नागरिक सदस्य सुट्ट्यांमध्ये बाहेर फिरायला जाणं पसंत करतात. हीच परिस्थिती मतदानादिवशी जाणवली..उन्हाळी सुट्ट्या, मतदारांची उदासीनता आणि मतदान प्रक्रियेतील अडथळे याचा फटका बसला. दरम्यान आदित्य ठाकरे यांच्या वरळीत मतदानाचा टक्का वाढेल असं अपेक्षित असताना तिथंही टक्का घसरला. तर महायुतीच्या उमेदवार यामिनी जाधव यांच्या भायखळा मतदारसंघातही मतदानाचा टक्का कमी झाला आहे. महाविकास आघाडीचे अरविंद सावंत आणि महायुतीच्या यामिनी जाधव यांच्यात सरळ लढत झाली. दोन्ही गटांकडून वरिष्ठ नेत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रचारसभा घेतल्या.निवडणूक आयोग आणि कर्मचारी तीन ते चार महिने मतदानाचा टक्का वाढावा म्हणून प्रयत्न करत होते. मात्र, टक्का वाढला तर नाहीच पण घसरला आहे…