राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी मंत्र्यांच्या दुष्काळासंदर्भातील बैठकीला गैरहजर राहण्यावरून सरकारला लक्ष्य केलं होतं. कृषीमंत्र्यांचा जिल्हा हा दुष्काळाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा जिल्हा असून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला तेसुद्धा हजर नव्हते. यावरून दुष्काळाकडे मंत्री किती गांभीर्याने बघतात याचं हे उत्तम उदाहरण आहे. आम्हाला दुष्काळाचं राजकारण करायचं नाही मात्र, राज्य सरकारने याकडे लक्ष द्यावं. या पद्धतीचे दुर्लक्ष तुमच्या सहकाऱ्याकडून होत असेल तर याची दखल घ्यावी अशी टीका त्यांनी केली होती.
त्यांच्या याच टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर देत, शरद पवार आणि महाविकास आघाडी सध्या नकारात्मक मानसिकतेत आहेत, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं. त्याचबरोबर दुष्काळात निवडणूक सुरू असतानाही प्रशासनाने त्यांच्या जबाबदाऱ्या नीटपणे पार पाडल्या आहेत. दुष्काळी भागात टॅंकर पुरवण्यापासून ते इतर अनेक उपाय योजना करण्यात आल्या आहेत. अजूनही महिनाभर या उपाययोजना सुरु राहणार आहेत. त्यादृष्टीने बैठका घेणं सुरू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही यासंदर्भातील बैठक घेतली आहे.
त्यामुळे सरकार गंभीरपणे या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. त्यामुळे दुष्काळासारख्या गोष्टीवर राजकारण करणं हे शरद पवारांना शोभत नाही, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तसेच शरद पवार यांच्या काही सुचना असतील तर त्यांनी त्या द्याव्यात त्याचा विचार आम्ही करू असेही ते म्हणाले.