नुकतीच लोकसभा निवडणुक पार पडली. त्यावेळीही महायुतीमध्ये जागावाटपावरून नाराजीनाट्य पाहायला मिळालं होतं. लोकसभा निवडणुकीत महायुतीत असलेल्या भाजपने सर्वाधिक जागा म्हणजे 28 जागांवर निवडणूक लढवली होती. त्यापाठोपाठ शिंदेंच्या शिवसेनेला 15 जागा आणि नंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 4 जागांवरच समाधान मानावे लागले होते. तर, राष्ट्रवादीने आपल्या कोट्यातील 1 जागा रासपच्या महादेव जानकर यांना देऊ केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये काही प्रमाणात नाराजीचा सूर उमटला.
आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ही नाराजी उघड झाल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेला किती जागा हव्यात हेच जाहीरपणे सांगितलं त्यावर, उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
महायुतीच्या जागावाटपात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीमध्ये शरद पवार यांच्या पक्षाला 10 जागा मिळाल्या पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 4 जागांवरच समाधान मानावे लागले. त्यावरुन, विरोधकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची खिल्ली उडवली होती. तर, पक्षातील काही नेतेही नाराज झाले होते. आता, छगन भुजबळ यांनी जागावाटपातील आपली नाराजी उघड केली आहे.
विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादीला 80-90 जागा देण्याचा भाजपचा शब्द आहे. लोकसभेसारखी विधानसभेला खटपट होता कामा नये, आपला हक्काचा वाटा आपल्याला मिळाला पाहिजे, असे म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवारांना सांगताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी मेळाव्यात आपली भूमिका मांडली. त्यामुळे, लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागण्यापूर्वीच विधानसभेच्या जागावाटपावरुन महायुतीत खलबंत सुरू झाल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी जागांबाबत केलेल्या दाव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करताना महायुतीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे, निश्चितच सर्वात जास्त जागा भाजपला मिळतील. तसेच, इतर सहकारी पक्षांना किती जागा द्यायच्या ते आम्ही एकत्र बसून ठरवू असं म्हटलं आहे. आता येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीत भाजप किती जागा स्वतःकडे ठेवणार? किती जागा घटकपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीला देणार याकडे राज्याचं लक्ष लागून आहे.