राज्यात एकीकडं मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन तर दुसरीकडं ओबीसींसाठी लक्ष्मण हाकेंचं उपोषण सुरुय. या दोन्ही आंदोलनाचं प्रमुख ठिकाण आहे ते जालना जिल्हा.जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मनोज जरांगे पाटील यांनी ८ जून रोजी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली. तर दुसरीकडं ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या लेखी आश्वासनासाठी जालन्यातीलच वडीगोद्री याठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी गेल्या ८ दिवसांपासून उपोषण सुरू केलं आहे. आरक्षणासाठी सुरू असलेला हा वाद नेमका काय आहे ? हेच आपण या व्हिडिओतून पाहू..
मराठा आरक्षण मुद्द्याचा मोठा परिणाम नुकतंच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत पाहायला मिळाला आहे.मनोज जरांगेंचा इम्पॅक्ट प्रामुख्याने मराठवाड्यात जाणवला असून महायुतीच्या उमेदवारांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे, आता विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही मनोज जरांगे पाटील यांनी तयारी दर्शवली आहे.आम्ही पहिल्या टप्प्यात 24 मतदारसंघाची चाचपणी केली आहे. आम्ही शांत का बसावे? कोणत्याही समाजावर अन्याय नाही झाला पाहिजे. इतर समाजांनी देखील आमच्यासोबत आले पाहिजे, यासाठी चाचपणी करत असल्याचं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहेत. जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी म्हटलं आहे की, मराठा समाजाला सरकारने 10 टक्के आरक्षण दिलं आहे. त्याची अंमलबजावणीही सरकारकडून करण्यात येत आहे. मराठा समाजाने ते 10 टक्के आरक्षण घेण्यास सुरुवातही केली आहे. दुसरं म्हणजे ईडब्लूएसच्या 10 टक्के आरक्षणापैकी 8.5 टक्के आरक्षणाचा लाभ मराठा समाजाने घेतला आहे. मनोज जरांगे यांची मागणी ही आहे की, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण दिलं पाहिजे, आता ओबीसीतून आरक्षण नाही दिलं तर जरांगे म्हणतात आम्ही 288 जागांवर निवडणुका लढवणार, ह्याला पाडणार, त्याला पाडणार. मात्र, हे आमच्या मुलाबाळांच्या आरक्षणाचं भविष्य उध्वस्त करणार असेल, तर आमचा समाज गप्प कसा बसेल, असा सवाल प्रकाश शेंडगे यांचा आहे.आरक्षण लढ्यासंदर्भातील या सर्व घडामोडी पाहिल्या तर ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा अत्यंत कळीचा मुद्दा झाला आहे.