शरद पवार गटाचे खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांना अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शएळके यांनी निवडूण आणलं आहे. मावळमधील आई एकविरा देवस्थानच्या विश्वस्थ मंडळासाठी झालेल्या निवडणुकीत सुरेश म्हात्रे विजयी झाले आहेत. यावेळी सुरेश म्हात्रे यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी खुलेपणाने मदत केल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे स्वतः सुनील शेळके आणि सुरेश म्हात्रे यांनी निवडणुकीनंतर दिलेल्या प्रतिक्रियेतून ही माहिती समोर आल्यानं आता महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
मावळमधील आई एकविरा देवस्थानच्या विश्वस्थ मंडळासाठी नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली. गेल्या वर्षी अर्थात जून 2023 साली या निवडणुकीसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळं ही निवडणूक एक वर्षाहून जास्त कालानं पुढं ठकलली गेली. जुलै 2024मध्ये ही निवडणूक पार पडली त्यावेळी सुनील शेळके यांच्या पाच समर्थकांनी सुरेश म्हात्रे यांना मतदान केलं. त्यामुळे 7-0 अशा फरकानं या निवडणुकीत सुरेश म्हात्रे यांचा विजय झाला. स्वतः आमदार सुनील शेळके या निवडणुकीवेळी त्या ठिकाणी पूर्णवेळ उपस्थित होते.
चया निवडणुकीनंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आम्ही स्वतंत्र पक्षात असलो तरी आमचं प्रेम वेगळं आहे. त्यांना मी दिलेला शब्द पाळला,” असं म्हणत निर्माण होणाऱ्या चर्चांवर शेळकेंनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी माझं नाव शरद पवारांच्या गटात प्रवेश करणाऱ्यांच्या यादीत आहे. तर मग त्यांना विचारा, मी कधी येऊ? अशी मिश्किल टिपणी ही शेळकेंनी खासदार म्हात्रेंसमोरचं केली.
शेळकेंच्या प्रतिक्रियेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी आमदार सुनील शेळकेंचे आभार मानले. “आज माझी विश्वस्त म्हणून नेमणूक झालेली आहे. त्यामुळे मी आदरणीय आमदार सुनील शेळके यांचे मनापासून आभार व्यक्त मानतो. हा जून 2023 मधील विषय होता. 18 जुलै रोजी आम्ही सर्वांनी अर्ज भरले होते. मात्र, त्यानंतर कोर्टातून काहीना काही अडचणी आल्यामुळे निवडणुकीला खूप उशीर झाला. सर्व विश्वस्तांनी मला आणि दीपकअण्णांना सातच्या सात मतं दिली. त्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आई एकविरा हे फार मोठं देवस्थान आहे. त्यामुळे येथील समस्या सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करु” असा विश्वास यावेळी सुरेश म्हात्रेंनी व्यक्त केला. त्यामुळं आता शरद पवारांच्या खासदारांच्या विजयात अजित पवारांच्या आमदाराने मदत केल्यामुळे आता राज्यात राजकीय चर्चांना अधाण आलं आहे.