लोकसभा निवडणुकीत महायुतीला ज्या कारणांमुळे फटका बसला, त्याच कारणांची पुनरावृत्ती महायुती प्रामुख्यानं भारतीय जनता पार्टी पुढेही करत असल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, कालांतराने संबंधित नेता भाजप किंवा महायुतीत आला तर त्याच्यावर सुरु असेलेली चौकशी बंद करायची किंवा क्लीनचिट देऊन टाकायची. सध्या ताज्या घटनाक्रमात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांना अशी क्लीन चिट मिळाली आहे. वायकर यांनी जोगेश्वरी इथं 500 कोटी रुपयांचा भूखंड घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. आता वायकर यांच्या विरोधातील ही तक्रार गैरसमजातून दाखल झाली होती, असं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलं आहे. म्हणजेच गलती से मिस्टेक झाल्याचं दाखवण्यात आलं आहे पण असं करून महायुती पुन्हा येरे माझ्या मागल्या गरत करत आहे का? हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत…
किरीट सोमय्या यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले अनेक नेते आज महायुतीत आहेत.त्यांच्याविषयी किरीट सोमय्या आता काही बोलत नाहीत.रवींद्र वायकर जोपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबत होते, तोपर्यंत तपासयंत्रणानी त्यांना हतबल केलं होतं.मग अचानक तपास यंत्रणांना असं काय वाटलं की वायकर यांच्या विरोधातील ती तक्रार गैरसमजुतीतून दाखल करण्यात आली होती? तपासयंत्रणा इतक्या आंधळेपणाने काम करत असतात का? आणि ज़र त्या अशा पद्धतीनं वागत असतील तर, त्यांच्यावर अंकुश कसा ठेवायचा? की असे खोटे गुन्हे दाखल केल्याप्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांना सजा दिली पाहिजे. त्यांना नोकरीतून काढून टाकले पाहिजे. तरच, ईडी, सीबीआय सारख्या संस्थांनाही चाप बसेल. त्याचं कारण म्हणजे वायकर यांच्या प्रकरणात ईडीने त्यांच्या घरावर छापा मारला होता. ईडीने वायकर यांची अनेक तास चौकशी केली होती. इतकं सगळं घडूनही वायकर यांच्या विरोधातील ती तक्रार गैरसमजुतीतून दाखल झाली होती असं आर्थिक गुन्हे शाखेनं म्हटलं आहे. वायकर यांच्या विरोधातील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असताना लोकांना जे आवडलं नाही त्याच गोष्टींची पूनरावृत्ती महायुती अर्थात भारतीय जनता पार्टी पुन्हा करत असेल तर आता विधानसभा निवडणुकीतही महायुतीसमोर जनतेचा विश्वास संपादन करण्याचं मोठं आव्हान उभं राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.